नागपूर शहरात डासांचा प्रकोप वाढला : मनपा निद्रावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 09:00 PM2020-03-21T21:00:54+5:302020-03-21T21:02:15+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाच, शहरात डासांचा प्रकोप वाढत आहे. अधेमधे बरसणाऱ्या पावसामुळे साचणाऱ्या डबक्यांमुळे डासांची संख्या वाढत असून, शहरातील प्रत्येक भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Outbreak of mosquitoes increased in Nagpur city: Municipal sleep deprivation | नागपूर शहरात डासांचा प्रकोप वाढला : मनपा निद्रावस्थेत

नागपूर शहरात डासांचा प्रकोप वाढला : मनपा निद्रावस्थेत

Next
ठळक मुद्देफॉगिंग बंद असल्याने नागरिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाच, शहरात डासांचा प्रकोप वाढत आहे. अधेमधे बरसणाऱ्या पावसामुळे साचणाऱ्या डबक्यांमुळे डासांची संख्या वाढत असून, शहरातील प्रत्येक भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आधीच मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांची समस्या नागपूरकर भोगून आहेत. त्यात कोरोना संक्रमणाचे संकट निर्माण झाले आहे कोरोनामध्ये तीव्र ताप आणि कोरडा खोकल्यासह घशात दुखण्याची लक्षणे आहेत. डेंग्यूमध्येही तीव्र ताप असतो. डेंग्यूवर आतापर्यंत कोणतीच व्हॅक्सिन निघालेली नाही. अशा चहुबाजूंनी निर्माण होणाऱ्या संकटामुळे डासांवर नियंत्रण मिळविण्याची मागणी होत आहे. असे असतानाही मनपा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येते. फॉगिंग मशीन बंद आहे. मलेरिया-फायलेरिया विभागाकडे नगरसेवकांकडून फॉगिंग मशीनची मागणी झाल्यास, विभागाकडून पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याचे कारण पुढे केले जाते. शहराच्या मध्यभागात असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्रमुख मार्केटसोबतच नागरिकांची वहीवाटही आहे. येथे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. रामदासपेठ, धंतोली या भागात मोठ्या संख्येने इस्पितळे आहेत. या भागात डासांचा प्रकोप वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सीताबर्डी, गोकुळपेठ, रामदासपेठ, शिवाजीनगर, आरटीओ विभाग, धरमपेठ, शंकरनगर, बजाजनगर, महाराज बाग, हिस्लॉप कॉलेज, पत्रकार कॉलनी या भागातही डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये अविकसित ले-आऊट्सची भरमार आहे. मोकळे भूखंड, झुडपांची संख्या येथे जास्त आहे. येथे डासांचा प्रकोप प्रचंड वाढला आहे. या प्रभागात भारतनगर, गुलमोहरनगर, विजयनगर, लक्ष्मीनगर, शिक्षक कॉलनी, भरतवाडा रोड परिसर, पारडी, पुनापूरमध्ये संध्याकाळच्या वेळी डासांचा प्रकोप वाढलेला असतो. त्यामुळे नागरिकांचे घरात राहणे कठीण असते तर प्रभाग २६ मध्ये भांडेवाडी परिसर येतो. या भागात कचरा डम्पिंग  यार्ड आहे.
डम्पिंग यार्डमुळे तसेही या भागातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच डासांचे संकट कोसळले आहे. जवळच वाठोडा भाग येतो. येथे नागरिकांना घरात आणि घराबाहेर उभे राहणे तारेवरची कसरत झाली आहे. प्रभाग २७ मधील नंदनवन कॉलनी, नंदनवन झोपडपट्टी, हसनबाग, सद्भावनानगर, कवले क्वॉर्टर, श्रीनगर, ओमनगर, नेहरूनगर, सुदामपुरी, भांडेप्लॉट, बापूनगर, आयुर्वेदिक ले-आऊट, मीरे ले-आऊट, आनंदनगरातही डासांनी थैमान घातले आहे.

डासांवर नियंत्रण मिळविण्यात मनपा अपयशी
प्रभाग क्रमांक १५ चे भाजप नगरसेवक सुनील हिरणवार यांनी या भागात डासांमुळे निर्माण झालेल्या समस्येवर मनपाचे लक्ष वेधले आहे. कोरोनामुळे नागपूर ‘लॉकडाऊन’ झाले. नागरिकांच्या हिताचा हा निर्णय योग्य आहे. मात्र डासांचा सामना रोजच करावा लागतो आणि त्यापासून सुटका मिळवून देण्यात मनपा पूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

मनपाने उपाययोजना कराव्या
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी डासांच्या समस्येवर योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहराच्या सीमावर्ती भागापासून ते मध्यवर्ती व पॉश भागातही डासांचा प्रकोप वाढला आहे. योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर आजारांचा प्रकोप वाढण्यास वेळ लागणार नाही. नागरिक कोरोनामुळे आधीच भयभीत झाले आहेत. अशाात डेंग्यू, मलेरियाचा आजार वाढल्यास शहरात हाहाकार माजेल, अशी भावना वनवे यांनी व्यक्त केली.

 

Web Title: Outbreak of mosquitoes increased in Nagpur city: Municipal sleep deprivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.