लॉकडाऊनमध्येच कोरोना संसर्गाचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST2021-03-28T04:09:07+5:302021-03-28T04:09:07+5:30
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे झाले दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाने नागपुरात १५ ते ३१ ...

लॉकडाऊनमध्येच कोरोना संसर्गाचा स्फोट
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे झाले दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाने नागपुरात १५ ते ३१ मार्च दरम्यान टाळेबंदी लावली आहे. परंतु, संक्रमणाचा वेग याच काळात सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. टाळेबंदीच्या १३ दिवसातच नागपुरात ४४,३४८ संक्रमित रुग्ण आढळले आहेत आणि ४१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या १३ दिवसात आढळलेल्या संक्रमितांची संख्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा अर्थात सप्टेंबर महिन्यातील संख्येपेक्षा ४१०९ ने कमी आहे. संक्रमणाचा हा वेग असा कायम राहिला तर केवळ दोन दिवसात सप्टेंबरमधील एकूण संक्रमितांचा आकडा याच टाळेंबदीत तुटण्याची शक्यता प्रबळ आहे. एका अर्थाने निर्बंधाच्या काळातच संक्रमण अनिर्बंध झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ट्रीटमेंट व आयसोलेशन यावर अधिक भर देण्याची गरज आहे. मुळात याकडेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
संक्रमणाची ही स्थिती धोकादायक आहे. प्रशासनाकडून रुग्णांना उपचार मिळवून देण्याचे प्रयत्न केले जात आहे. परंतु, त्यात ते अपयशी ठरत आहेत. शहरातील इस्पितळांसह जिल्ह्यातील इस्पितळे फुल्ल झाली आहेत. वेळेवर उपचार मिळत नसल्याने मृत्यूची संख्याही वाढत आहे. गरजूंना वेळेवर उपचार मिळाले नाही तर स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती आहे. विशेष म्हणजे, गेल्या १३ दिवसाच्या टाळेबंदीत जेवढे संक्रमित आढळले आहेत. तेवढे संक्रमित रुग्ण सप्टेंबर वगळता अन्य कोणत्याही महिन्यात आढळलेले नाहीत. यामुळे, संसर्गाच्या या वाढत्या प्रकोपाने अनेकांच्या मनात सद्यस्थितीत सुरू असलेल्या टाळेबंदीचा लाभ कोणता, असा सवाल उपस्थित होत आहे.
---बॉक्स
६५०६२ संक्रमित, ३.३० लाख चाचण्या
मार्च महिन्यातील २७ दिवसाचा विचार केला तर ६५,०६२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. कुठल्याही महिन्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. तसेच ५३८ रुग्णांचा मृत्यू झाला. मार्चच्या २७ दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या ८२५३ वरून ३७,३४३ वर पोहोचली. २७ दिवसात २९,०९० कोरोनाचे रुग्ण वाढले.
चौकट
लॉकडाऊन दरम्यान आढळलेले संक्रमित व मृत्यू
तारीख संक्रमिक मृत्य
१५मार्च २२९७ १२
१६ मार्च २५८७ १८
१७ मार्च ३३७० १६
१८ मार्च ३७९६ २३
१९ मार्च ३२३५ ३५
२० मार्च ३६७९ २९
२१ मार्च ३६१४ ३२
२२ मार्च ३५९६ ४०
२३ मार्च ३०९५ ३३
२४ मार्च ३७१७ ४०
२५ मार्च ३५७९ ४७
२६ मार्च ४०९५ ३५
२७ मार्च ३६८८ ५४
एकूण ४४,३४८ ४१४