नागपूर मनपाच्या परिवहन विभागात १.५४ कोटींच्या तिकीट मशीनची नियमबाह्य खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 21:31 IST2018-01-02T21:29:25+5:302018-01-02T21:31:57+5:30
महापालिकेच्या परिवहन समितीचा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव नसताना परिवहन विभागाने निविदा न काढता शहर बस वाहतुकीसाठी १ कोटी ५४ लाखांच्या ८०० इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनची (ईटीएम) नियमबाह्य खरेदी केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.

नागपूर मनपाच्या परिवहन विभागात १.५४ कोटींच्या तिकीट मशीनची नियमबाह्य खरेदी
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीचा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव नसताना परिवहन विभागाने निविदा न काढता शहर बस वाहतुकीसाठी १ कोटी ५४ लाखांच्या ८०० इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनची (ईटीएम) नियमबाह्य खरेदी केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या कोणत्याही विभागाला साहित्याची गरज भासल्यास ती खरेदी करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते. संबंधित विभागाच्या समितीकडून स्थायी समितीकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला जातो. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर निविदा काढून साहित्याची खरेदी केली जाते. परंतु परिवहन विभागाने सर्व नियम धाब्यावर बसवून परस्पर मुंबई येथील मे. व्हेरीफोन इंडिया सेल्स प्रा. लि. या कंपनीकडून ईटीएम मशीनची खरेदी केली आहे. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची महापालिकेत चर्चा आहे. नागपूर शहरातील रस्त्यांवर आपली बसच्या ३६५ बसेस धावत आहेत. तसेच २० ग्रीन बसेस आहेत. परिवहन विभागाकडे सध्या ६०० ईटीएम आहेत. त्या सुस्थितीत आहेत. असे असतानाही परिवहन विभागाने तब्बल १.५४ कोटींच्या ८०० ईटीएम खरेदी केल्या आहेत. परिवहन समितीला याबाबत अंधारात ठेवण्यात आले आहे. ईटीएम खरेदीच्या निविदा काढल्या असत्या तर स्पर्धा होऊन महापालिकेला कमी दराने मशीनचा पुरवठा करणारे कंत्राटदार पुढे आले असते.
मशीनची खरेदी करताना मे. व्हेरीफोन इंडिया सेल्स प्रा. लि. या कंपनीसोबत कशा स्वरूपाचा करार करण्यात आला. यातील शर्ती व अटी, बॅक गॅरंटी घेण्यात आली की नाही. खरेदी करण्यात आलेल्या ईटीएमचे वैशिष्ट्य, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कुणाची, मशीनची चाचणी कुणी घेतली, याची परिवहन विभागाच्या स्टॉक रजिस्टवर नोंद करण्यात आलेली आहे का, खरेदी प्रक्रियेत डिम्स कंपनीचा सहभाग आहे का, अशा स्वरुपाची विचारणा समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी परिवहन व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रातून केली आहे.