बातमीच्या पलीकडे ‘आऊट लुक ’ करणारा एडिटर
By Admin | Updated: March 9, 2015 01:51 IST2015-03-09T01:51:37+5:302015-03-09T01:51:37+5:30
ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता यांच्या निधनाची बातमी कळली आणि साऱ्या

बातमीच्या पलीकडे ‘आऊट लुक ’ करणारा एडिटर
मोईज मन्नान हक
ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता यांच्या निधनाची बातमी कळली आणि साऱ्या आठवणींचा पट माझ्या डोळ्यासमोर आला. अनेकदा एखादा माणूस आपल्यासोबत असतो तेव्हा त्याचे मोठेपण काय आहे? याचा विचारही आपण करीत नाही. पण त्या माणसाला आपण हरवितो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्याला कळतात. विनोद मेहता म्हणजे असेच व्यक्तिमत्त्व. बातमीसाठीही अभ्यास करावा लागतो आणि पत्रकाराची नजर इतरांपेक्षा वेगळी असावी लागते, हे शिकविणारा माणूस तो होता. बातमी कुठल्याही प्रदेशाची असो बातमीवर प्रामाणिक प्रेम करणारे संपादक म्हणजे विनोद मेहता होते.
पत्रकारितेच्या प्रारंभीच्या काळात मला कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची इच्छा होती. मी व्यवस्थापनशास्त्राची पदवी घेतली होती. पण अगदीच नवीन असल्याने काही काळ पत्रकारिता करण्याचे मी ठरविले. ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांच्याशी ओळख होती. तेव्हा ते मुंबईला इंडियन पोस्टमध्ये मुख्य वार्ताहर होते आणि विनोद मेहता संपादक होते. तेथे मी मुलाखतीसाठी गेलो. भारतकुमार राऊत यांच्याकडे मी विनोद मेहता यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आत फोन केला तेव्हा मेहता खूप व्यस्त होते. पण त्यांनी पाच मिनिटांसाठी मला बोलाविले आणि तब्बल दीड तास विदर्भाच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. त्यांचा एवढा अभ्यास पाहून मी प्रभावित झालो. त्यानंतर त्यांनीच मला इंडियन पोस्टचे विदर्भ करस्पॉन्डट म्हणून रुजू करून घेतले. त्यांचे व्हिजन ग्लोबल होते. विदर्भातल्या समस्यांना त्यांनी मुंबईच्या वर्तमानपत्रात महत्त्वाचे स्थान दिले. विदर्भाच्या माझ्या बातम्यांवर त्यांनी कधीच अन्याय केला नाही. सीताबर्डीच्या आर्मी बटालियनच्या जागेवर झोपडपट्टी वसली होती. रात्री आर्मीच्या लोकांनी झोपडपट्टी हटविली आणि गरीब नागरिकांना ते मारहाण करायला लागले. त्यावेळी खा. बनवारीलाल पुरोहित झोपडपट्टीवासीयांच्या बाजूने उभे राहिले. ही बातमी डेव्हलप होत असताना मी मेहतांना फोन केला. त्यांनी बातमी पाठवण्याचे सांगितले. बराच वेळ प्रयत्न केल्यावर माझ्या हाती बातमी लागली. पण या बातमीसाठी त्यांनी प्रथम पानावर जागा राखून ठेवली होती. त्यादिवशी पेपरच्या प्रिंटिंगलाही उशीर झाला, पण त्यांनी ही बातमी मोठी घेतली होती. पुरोगामी विचारांचे मेहता माझ्या पिढीसाठी आदर्शच होते. लहान माणसांशीही सतत संपर्क ठेवून राहणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या जाण्याचे दु:ख आहे.
(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे सहायक प्राध्यापक आहेत.)