हमारा गाव, हमारा राज!
By Admin | Updated: June 23, 2014 01:20 IST2014-06-23T01:20:45+5:302014-06-23T01:20:45+5:30
आदिवासींच्या विकासासाठी राज्यातील आदिवासीबहुल जिल्हे तयार करून त्यांना स्वायतत्ता द्या. या धर्तीवर शासकीय यंत्रणा राबवून जिल्ह्यात हमारा गाव, हमारा राज येण्यासाठी लढा उभारण्याचे अवाहन

हमारा गाव, हमारा राज!
आदिवासी निर्धार मेळावा : मधुकर पिचड यांचे आवाहन
नागपूर : आदिवासींच्या विकासासाठी राज्यातील आदिवासीबहुल जिल्हे तयार करून त्यांना स्वायतत्ता द्या. या धर्तीवर शासकीय यंत्रणा राबवून जिल्ह्यात हमारा गाव, हमारा राज येण्यासाठी लढा उभारण्याचे अवाहन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी रविवारी केले.
आदिवासी समाज संयुक्त कृती समितीतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित आदिवासी निर्धार व प्रबोधन मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात पिचड बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी, माजी खासदार मारोतराव कोवासे, आमदार आनंदराव गेडाम, नामदेवराव उसेंडी, केवलराम काळे आदी उपस्थित होते.
मागासलेपणा व संस्कृती या आधारावर घटनेने आदिवासींना आरक्षण दिले आहे. आरक्षण देताना प्रत्येक राज्याची परिस्थिती व संस्कृती विचारात घेतली जाते. कर्नाटक व केरळ राज्यात मराठा समाजाचा आदिवासीत समावेश आहे. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश आहे. या आधारावर त्यांना महाराष्ट्रात आरक्षण देणार का? असा सवाल पिचड यांनी केला.
आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. परंतु आदिवासींच्या आरक्षणात दुसऱ्यांचा वाटा आम्ही खपवून घेणार नाही. आदिवासी पेटला तर महाराष्ट्रही पेटेल याचा राज्यातील ७८ विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल, असा इशारा पिचड यांनी दिला. मताच्या राजकारणासाठी आदिवासींचा बळी देऊ नका, बोगस आदिवासींचे अतिक्र मण थोपविण्यासाठी आदिवासींनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजाच्या हक्कासाठी आम्ही प्राणांचीही पर्वा करणार नाही. वाट्याला जाणाऱ्यावर आदिवासींचे हात उठतील असा इशारा वसंत पुरके यांनी दिला. देशात दहा कोटी तर राज्यात सव्वाकोटी आदिवासी आहे. लोकसंख्येचा विचार करता आदिवासींना १० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. २२ जातींचा आदिवासीत समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहे. याऐवजी त्यांनी वेगळ्या सवलती मागण्याला आमचा विरोध नाही. आदिवासी हक्कासाठी संघटित होणार नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नसल्याचे शिवाजीराव मोघे म्हणाले.
काही राजकीय नेते बोगस आदिवासींना आरक्षणाचे आश्वासन देत आहेत. याचा समाजाने विरोध करावा, असे आवाहन पद्माकर वळवी यांनी केले. मारोतराव क ोवासे, आमदार आनंदराव गेडाम, नामदेव उसेंडी, केवलराम काळे यांच्यासह माजी महापौर माया इवनाते, पुष्पाताई आत्राम, सुखदेव पारधी, दिलीप मडावी, ज्ञानेश्वर मडावी, मणिराम मडावी आदींनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला आदिवासी संघटनांचे विदर्भातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)