अन् आमचा ऊर अभिमानाने भरून आला
By Admin | Updated: September 11, 2015 03:17 IST2015-09-11T03:17:44+5:302015-09-11T03:17:44+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील लक्षावधी दलित, शोषित पीडितांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला.

अन् आमचा ऊर अभिमानाने भरून आला
याचि देही याचि डोळा :
आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या सद्गदित भावना
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील लक्षावधी दलित, शोषित पीडितांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. लाखो वर्षांच्या शोषणातून त्यांची मुक्तता केली त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे आज जपान येथे अनावरण होत असताना बघून अभिमानाने ऊर भरून आला. या विश्वरत्नाच्या महान कार्याला जगाने घातलेला हा कुर्निसात आहे, अशा सद्गदित भावना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी लोकमतशी थेट जपानवरून बोलताना व्यक्त केल्या.
जपानच्या कोयासन विद्यापीठ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांच्यासह नागपुरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले होते. त्यांनी थेट जपानवरून लोकमतशी बोलताना या कार्यक्रमाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
माजी मंत्री सुलेखा कुंभारे म्हणाल्या, जपान हे बौद्ध राष्ट्र आहे. त्यामुळे बुद्धाची भूमी असलेल्या भारताबद्दल त्यांच्या मनात पूर्वीपासूनच आदर राहिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीने तर जपानही भारावून गेले आहे. त्यामुळे बाबासाहेबांबद्दल जपानच्या नागरिकांमध्ये विशेष प्रेम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जग ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखतो.