महायुतीत कवाडे यांना घेतल्यास आमचा विरोध - रामदास आठवले
By आनंद डेकाटे | Updated: January 9, 2023 14:56 IST2023-01-09T14:54:20+5:302023-01-09T14:56:52+5:30
महायुतीमध्ये मी आहे, त्यामुळे दुसऱ्या रिपाईची गरज नाही

महायुतीत कवाडे यांना घेतल्यास आमचा विरोध - रामदास आठवले
नागपूर : जोगेंद्र कवाडे यांनी शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी युती केली त्याला आमची हरकत नाही. मात्र कवाडे यांना महायुतीमध्ये घेतल्यास त्याला आमचा विरोध राहील, असे केंद्रीय राज्यमंत्री व रिपाई (आठवले) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे स्पष्ट केले.
ते एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता रविभवन येथे ते 'लोकमत'शी बोलत होते. आठवले यांनी सांगितले की, महायुतीमध्ये मी आहे, त्यामुळे दुसऱ्या रिपाईची गरज नाही. कवाडे सर आमचे नेते आहेत, त्यांना माझा व्यक्तिगत विरोध नाही. ते पक्ष म्हणून शिवसेनेशी युती करू शकतात. शिंदे यांच्याशी युती करायला आमची हरकत नाही. मात्र त्यांना महायुतीमध्ये घ्यायला आमचा विरोध राहील. शिंदे गट हा महायुतीचा भाग आहे, त्यामुळे त्यांनी कवाडे यांच्याशी युती करताना आम्हालाही विश्वासात घ्यायला हवे होते, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.