आमची ठणकली त्या दिवशी तुमची झोप उडवू -पटेल
By Admin | Updated: June 1, 2017 18:23 IST2017-06-01T18:23:23+5:302017-06-01T18:23:23+5:30
‘ज्या दिवशी आमची ठणकली, त्या दिवशी आम्ही सर्वांची झोप उडवू’, असा इशारा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला.

आमची ठणकली त्या दिवशी तुमची झोप उडवू -पटेल
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : शासकीय रूग्णालयात गरिबांना उपचार होऊन आपला जीव वाचणार असे वाटते. मात्र येथील रूग्णालयांत लोकांचे जीव जात आहे. बाई गंगाबाई रूग्णालयात ३४ मुलांचा जीव गेला ही साधारण बाब नाही. मात्र एवढ्या गंभीर विषयावर एकही जनप्रतिनिधी बोलायला तयार नाही ही खेदाची बाब आहे. मात्र या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. सर्व म्हणतात तुम्ही काहीच बोलत नाहीत. मात्र आम्ही म्हणत होतो काही काळ धीर धरा. आता मात्र तीन वर्षे लोटली असून सरकार काहीच करीत नसल्याचे दिसत आहे. मात्र त्यांनी लक्षात घ्यावे ‘ज्या दिवशी आमची ठणकली, त्या दिवशी आम्ही सर्वांची झोप उडवू’, असा इशारा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शहरात शेतकरी कर्जमाफी यासह नागरिकांच्या विविध विषयांना घेऊन गुरूवारी (दि.१) आयोजीत धरणे आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात मंचावर फक्त खासदार प्रफुल्ल पटेल विराजित होते माजी आमदार राजेंद्र जैन, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, शहर अध्यक्ष अशोक सहारे व अन्य उपस्थित होते.
उप विभागीय अधिकारी कार्यालया समोर आयोजीत या आंदोलनात पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, दोन वर्षांपूर्वी नितीन गडकरी यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यासाठी आठ हजार कोटींच्या रस्त्यांचे भूमीपूजन केले होते. त्यातील किती रस्त्यांचे काम झाले याबाबत अभियंत्यांशी विचारणा केली असता त्यांनी निधी तर सोडाच मात्र यातील रस्ते कोणते याचीही माहिती नसल्याचे सांगीतले. यातून हे सरकार किती विकासकामे करीत आहेत याची प्रचिती येत असल्याचा टोला लगावला. सन २०१० मध्ये आसाममधील पुलाचे भूमीपूजन झाले होते. त्याचे काम सुरू होते. आता मात्र सत्ताधारी हे आपलेच काम असल्याचे दाखवित आहेत. या देशात आज जे काही होत आहे. ते यांच्यामुळेच होत असल्याचा माहौल निर्माण केला जात असल्याचे पटेल म्हणाले.
दरम्यान उपस्थित अन्य मान्यवरांच्या भाषणांनंतर बैलगाडीने खासदार पटेल जयस्तंभ चौकात पोहचले व त्यांनी चौकात रस्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांसह अन्य विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: जागेवर येऊन स्वीकारावे व तेथूनच वरिष्ठांशी बोलणी करावी अशा सूचना यंत्रणेला पूर्वीच देण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हाधिकारी आले नाही व त्यांचे प्रतिनिधी म्हणून उप जिल्हाधिकारी मंगेश मोहिते आले. यावर मात्र रस्ता रोको आंदोलन मागे न घेतले असता खासदार पटेल यांच्यासह आंदोलनकाऱ्यांना अटक करण्यात आली.