आमच्या देशालाही ‘बाबासाहेब’ हवे होते
By Admin | Updated: October 3, 2014 02:53 IST2014-10-03T02:53:20+5:302014-10-03T02:53:20+5:30
बुद्धाचा धम्म आमच्या व्यवहारातच नव्हे तर आचारणात सुद्धा आहे. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष भारताला लाभले.

आमच्या देशालाही ‘बाबासाहेब’ हवे होते
नागपूर : बुद्धाचा धम्म आमच्या व्यवहारातच नव्हे तर आचारणात सुद्धा आहे. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष भारताला लाभले. त्यामुळे भारताबद्दल आम्हाला विशेष आदर आहे. आम्हाला बाबासाहेबांसारखी व्यक्ती लाभली नाही, ही खंत आहे. कदाचित आम्हालासुद्धा बाबासाहेबांसारखी व्यक्ती मिळाली असती तर, असा प्रश्न थायलंडमधील एका ज्येष्ठ महिला पत्रकाराने उपस्थित केला.
डॉ. रुंगथिप चोटनापलाई असे या पत्रकार महिलेचे नाव आहे. डॉ. रुंगथिप या थाई टीव्ही चॅनलच्या पत्रकार असून न्यूज अँकर सुद्धा आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांना विशेष आवड आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी संशोधन केले असून त्यांची डॉक्युमेंट्री सुद्धा तयार केली आहे. थायलंडमधील जनतेमध्ये त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचे कार्य करतात. दीक्षाभूमीवर आलेल्या ३८ प्रतिनिधींसोबत त्या सुद्धा आल्या आहेत.
यावेळी डॉ. एस.के. गजभिये यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. थायलंड हे ९० टक्के बुद्धीस्ट राष्ट्र आहे.
बुद्ध आमच्या देशात झाले नाही, तरीही आमच्या राष्ट्राने बुद्ध धम्म स्वीकारला. आज आमच्या आचारणात धम्म आहे.
तथागत गौतम बुद्ध हे भारतात होऊन गेल्याने भारताबद्दलचा आदर हा नेहमीच राहिला आहे. परंतु भारत म्हणजे केवळ बुद्धगया आणि आजूबाजूचा परिसर इतकेच आजवर आम्हाला माहिती होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आम्ही जसजसे ऐकले.
त्यांच्याबाबत अधिकाधिक माहिती मिळविली तेव्हा आम्हाला धक्काच बसला. जो धम्म या देशातून हद्दपार झाला होता, तो त्यांनी पुनर्जीवित केला.
बुद्धगयेच्या बाहेरही बुद्ध धम्म आहे, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आज नागपुरात आल्यावर भारतात बुद्ध धम्माची पाळेमुळे किती खोलवर रुजली याचा प्रत्यय आला. यांचे संपूर्ण श्रेय बाबासाहेबांनाच जाते. त्यांचे त्रिवार धन्यवाद. डॉ. गजभिये यांनी अनुवाद केला. (प्रतिनिधी)