उस्मानने घेतली याकूबची भेट
By Admin | Updated: July 21, 2015 03:10 IST2015-07-21T03:10:53+5:302015-07-21T03:10:53+5:30
मुंबई बॉम्बस्फोटाच्या मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याची सोमवारी त्याचा चुलत भाऊ उस्मान मेमन आणि स्थानिक

उस्मानने घेतली याकूबची भेट
नागपूर : मुंबई बॉम्बस्फोटाच्या मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याची सोमवारी त्याचा चुलत भाऊ उस्मान मेमन आणि स्थानिक वकील अॅड. अनिल गेडाम यांनी कारागृहात भेट घेतली. यादरम्यान कारागृहाच्या आतबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. हे दोघेही प्रसार माध्यमाच्या संपर्कात येऊ नये, याचीही पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.
याकूबचा डेथ वॉरंट आल्यानंतर तो आणि त्याचे कुटुंबीय प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, याकूबची पत्नी, मुलगी आणि अन्य काही नातेवाईक त्याची भेट घ्यायला येणार असल्याची माहिती उघड झाली होती. त्यामुळे सकाळी १० वाजतापासूनच मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचाही प्रचंड बंदोबस्त होता. दुपारी १ च्या सुमारास याकूबचे स्थानिक वकील अॅड. अनिल गेडाम हे कारागृहाच्या आत गेले. त्यांनी याकूबचा चुलत भाऊ उस्मान मेमन भेटायला आल्याची रीतसर नोंद केल्यानंतर दुपारी १.४५ वाजता उस्मान मेमनला मुख्य दारातून आत सोडण्यात आले. पाऊण तासानंतर या दोघांनाही पोलिसांनी कडक बंदोबस्तात बाहेर काढले. याकूबची पत्नी आणि मुलगी मात्र आलीच नाही.
याकूब ढसाढसा रडला
वकिलाशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर याकूब उस्मानसोबत बोलू लागला. कदाचित ही शेवटची भेट असू शकते, याची कल्पना असल्यामुळे याकूब आणि उस्मान कमालीचे भावुक झाले होते. ते दोघेही एकमेकांच्या समोरासमोर बराच वेळ ढसाढसा रडले. परिणामी कारागृहाच्या व्हिजिटर रुममधील वातावरण अधिकच धीरगंभीर झाले. याकूबने त्याची पत्नी, मुलगी आणि अन्य नातेवाईक कसे आहेत, त्याची उस्मानकडे विचारपूस केली. आता तुला त्यांची काळजी घ्यावी लागेल, असेही याकूबने उस्मानला सांगितल्याचे समजते. भावनिक गुंतागुंतीमुळे आपण तेथून बाजूला झालो, असे अॅड. गेडाम यांनी यानुषंगाने लोकमतशी बोलताना सांगितले.
ओळखी नसल्यामुळे...
उस्मान मेमनला नागपुरात पत्रकारांपैकी कुणी ओळखत नसल्यामुळे तो सहजपणे प्रवेशद्वारावर आला. आत गेल्यानंतर तो याकूबचा नातेवाईक असल्याचे कळले. त्यामुळे पत्रकारांची अस्वस्थता वाढली. तो बाहेर निघण्याची वाट बघत पत्रकार ताटकळत होते.