कस्तूरचंद पार्क येथे संविधान दिनाचे आयोजन

By Admin | Updated: November 11, 2015 02:14 IST2015-11-11T02:14:08+5:302015-11-11T02:14:08+5:30

देशभरात यंदाचे वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे.

Organizing Constitution Day at Kastoorchand Park | कस्तूरचंद पार्क येथे संविधान दिनाचे आयोजन

कस्तूरचंद पार्क येथे संविधान दिनाचे आयोजन

नागपूर विद्यापीठ : मुख्यमंत्री राहणार उपस्थित
नागपूर : देशभरात यंदाचे वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या समता वर्षात २६ नोव्हेंबर रोजी देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये संविधान दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेदेखील यानिमित्त भव्य आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कस्तूरचंद पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशासाठी अतिशय महत्त्वाचे हे वर्ष विधायक पद्धतीने कसे साजरे करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीने संविधान दिवस साजरा करण्याची शिफारस केली होती. देशभरातील विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस पाळण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच ‘युजीसी’तर्फे देण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र पाठविण्यात आले होते. यानुसार देशातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांत २६ नोव्हेंबर रोजी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात येणार आहे. याशिवाय खासगी विद्यापीठांत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
नागपूर विद्यापीठात गेल्या ३ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे हे आयोजन होणार आहे. विविध संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ विभागांतील विद्यार्थी सकाळी संविधान रॅली काढणार आहेत. सोबतच संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या जीवनमूल्यांचा पुरस्कार करणारी घोषवाक्य असलेले फलक सोबत आणण्याचे निर्देश विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. विभागप्रमुखांनी तसेच प्राचार्यांनी याची माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Organizing Constitution Day at Kastoorchand Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.