The organizational event of Nagpur BJP from July 6 | नागपूर भाजपाचे संघटन पर्व ६ जुलैपासून
नागपूर भाजपाचे संघटन पर्व ६ जुलैपासून

ठळक मुद्देनवनियुक्त शहराध्यक्षांची घोषणा प्रत्येक मंडळाला ५० हजार नवीन सदस्य नोंदणीचे ‘टार्गेट’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपा शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रवीण दटके यांनी लागलीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. ६ जुलैपासून शहरात भाजपा संघटन पर्व सुरू करणार असून प्रत्येक मंडळाला ५० हजार नवीन सदस्य नोंदणीचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. आ.सुधाकर कोहळे यांच्याकडून शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रविवारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. कार्यक्रमस्थळी आग लागल्याने इमारतीच्या बाहेर अंधारात दटके यांना कार्यकर्त्यांशी बोलावे लागले.
भाजपाच्या गणेशपेठ येथील शहर कार्यालयातील सभागृहात झालेल्या पदग्रहण सोहळ्यात खा.विकास महात्मे, आ.सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, संदीप जाधव, भोजराज डुंबे, जयप्रकाश गुप्ता, सुभाष पारधी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे व मी तो सार्थ ठरवेल. आमच्या पक्षात नेतृत्व बदल सहज होतो. सर्व आमदार, नगरसेवक, महामंत्री, बूथ प्रमुख सर्वांचे सहकार्य घेऊन संघटन आणखी बळकट करण्यावर भर असेल. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत शहरातील सर्वच्या सर्व सहा जागा जिंकू असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला.
यावेळी सुधाकर कोहळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जानेवारी महिन्यातच माझ्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे पदमुक्त होता आले नाही.
प्रभाकरराव दटके यांचे मला मौलिक मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्याच मुलाकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविताना समाधान वाटत आहे. दटके हे ऊर्जावान असून त्यांच्या क्षमतेचा पक्षाला फायदा होईल, असे कोहळे म्हणाले.
कार्यक्रमाला रमेश भंडारी, किशन गावंडे, संजय ठाकरे, बंडू राऊत, दिलीप गौर, महेंद्र राऊत, हादी कदीर, देवेन दस्तुरे, प्रगती पाटील, डॉ.किर्तीदा अजमेरा,बबली मेश्राम, प्रभाकर येवले, मनीष मेश्राम, केतन मोहितकर, श्याम चांदेकर, दीपक वाडीभस्मे, नाना उमाठे, विजय केवलरामानी, चंदन गोस्वामी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कॉंग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी तलवारी चालतात
यावेळी सुधाकर देशमुख यांनी आपल्या भाषणात कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. भाजपामध्ये अगदी सहजपणे अध्यक्ष बदलला जातो व कुणीही नाराज होत नाही.कॉंग्रेसमध्ये मात्र वर्षानुवर्षे एकच अध्यक्ष असतात. अध्यक्ष बदलताना तर तेथे तलवारी चालतात, कपडे फाडतात व वाद होतात, असे वक्तव्य त्यांनी केले.


Web Title: The organizational event of Nagpur BJP from July 6
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.