संघात होणार संघटनात्मक बदल
By Admin | Updated: March 12, 2015 02:34 IST2015-03-12T02:34:52+5:302015-03-12T02:34:52+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार १३ मार्चपासून उपराजधानीत सुरुवात होणार आहे.

संघात होणार संघटनात्मक बदल
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार १३ मार्चपासून उपराजधानीत सुरुवात होणार आहे. रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात होणाऱ्या या सभेत संघाच्या सरकार्यवाहांसोबतच नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे. संघात नेमके काय संघटनात्मक बदल होतात याकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे हे विशेष.संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. यंदाच्या सभेत सरकार्यवाह (संघातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पद) या पदाची निवड होणार आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासमवेत सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह सुरेश सोनी, डॉ. कृष्णगोपाल, दत्ताजी होसबळे यांच्यासह संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच संघ परिवाराच्या विविध संघटनांचे देशभरातील सुमारे १४०० प्रतिनिधी या सभेत सहभागी होणार आहे. यात संघाचे अखिल भारतीय प्रतिनिधी, क्षेत्रीय प्रचारक, माजी प्रांत प्रचारक, सहा सेवा विभागांचे प्रांत प्रमुख, प्रांतस्तराचे कार्यकर्ते, निवडक प्रतिनिधी आणि संघाच्या इतर संघटनांच्या ३०-३५ प्रतिनिधींचा समावेश आहे.
समन्वयावर मंथन होणार
नागपूर : प्रतिनिधी सभेसाठी प्रतिनिधी नागपुरात पोहोचलेदेखील आहेत. संघाच्या ‘कोअर कमिटी’च्या बैठकीत या सभेत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले आहेत. निवड प्रक्रियेसोबतच या तीन दिवसीय सभेत संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. शिवाय संघ परिवाराशी जुळलेल्या संस्थांमध्ये समन्वय वाढावा याकरिता मंथन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भय्याजी जोशी की होसबळे?
या सभेत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची फेरनिवड होते की दत्ताजी होसबळे यांची नियुक्ती करण्यात येते याकडे लक्ष लागले आहे. २०१२ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली होती. लोकसभा निवडणूकांत दोघांनीही संघातर्फे मोलाची भूमिका पार पाडली होती. गेल्या तीन वर्षांतील संघाने घेतलेले धोरण आणि राजकारणात वाढलेली सक्रियता यामुळे यंदा संघाकडून धक्का देण्यात येण्याची शक्यता आहे.
तुलनेने तरुण असलेले सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचादेखील विचार होण्याची प्रबळ शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दोघांपैकी एकाला केंद्र आणि संघामध्ये समन्वयकाची महत्त्वाची जबाबदारीदेखील देण्यात येऊ शकते, अशी माहिती संघाच्या सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)