९ वर्षांत केवळ ७३ दात्यांचे अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST2021-08-12T04:12:00+5:302021-08-12T04:12:00+5:30

--अवयवदान दिन सप्ताह सुमेध वाघमारे नागपूर : उपराजधानीतील शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये आठवड्यातून दोन तरी ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) रुग्णांची ...

Organ donation of only 73 donors in 9 years | ९ वर्षांत केवळ ७३ दात्यांचे अवयवदान

९ वर्षांत केवळ ७३ दात्यांचे अवयवदान

--अवयवदान दिन सप्ताह

सुमेध वाघमारे

नागपूर : उपराजधानीतील शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये आठवड्यातून दोन तरी ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) रुग्णांची नोंद होते. शासनाच्या निर्देशानुसार याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) देणे बंधनकारक आहे. असे असताना, मागील ९ वर्षांत केवळ ७३ दात्यांचे अवयव दान झाले. यावरून शासकीयसह खासगी रुग्णालयांकडून ‘ब्रेन डेड’ रुग्णांची माहिती दडवली जात असल्याचे वास्तव आहे.

मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदान महत्त्वाचे आहे. मात्र, मागणी व पुरवठा यात कमालीची तफावत आहे. हजारो रुग्णांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध होऊ शकत नसल्याने ते मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहेत. एका-एका अवयवांसाठी अनेक दिवस वाट बघत आयुष्य कंठणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याचे वास्तव आहे. ही संख्या कमी करण्यासाठी २०१३ मध्ये नागपुरात पहिल्यांदाच ‘झेडटीसीसी’ची स्थापना झाली. नागपुरात पहिले अवयवदान अमित सिंग या १८ वर्षीय ‘ब्रेनडेड’ तरुणाकडून झाले. नंतर या अवयवदान चळवळीला गती येणे आवश्यक होते. परंतु जनजागृतीची कमी, गैरसमज व ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या कुटुंबाचे समुपदेशन करून अवयवदानाची माहिती देण्यासाठी रुग्णालयाचा पुढाकाराचा अभाव यामुळे अयवदान चळवळीला गती येत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

-कोरोनात ९ दात्यांकडूनच अवयवदान

२०१३ मध्ये अवयवदानाला सुरुवात झाली. एका व्यक्तीकडून अवयवदान झाले. त्यानंतर २०१४ मध्ये ३, २०१५ मध्ये ४, २०१६ मध्ये ६, २०१७ मध्ये १४, २०१८ व २०१९ मध्येही प्रत्येकी १८ ‘ब्रेनडेड’ व्यक्तींकडून अवयवदान झाले. परंतु २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात होताच याला खीळ बसली. यावर्षी केवळ ३ तर २०२१ मध्ये ऑगस्टपर्यंत ६ दात्यांकडून अवयवदान झाले.

-१२७ मूत्रपिंड, १२५ यकृत, १३ हृदय व ३ फुफ्फुसांचे दान

२०१३ ते २०२१ या कालावधीत नागपूर विभागात अवयवदानातून १२७ मूत्रपिंड, १२५ यकृत, १३ हृदय, ३ फुफ्फुस, ३९ नेत्र व ८ रुग्णांकडून त्वचा मिळाली. विशेष म्हणजे, नागपुरात हृदय प्रत्यारोपणाची मंजुरी मिळून तीन वर्षांचा कालावधी होऊन येथील अनेक रुग्ण चेन्नई, मुंबईत नोंदणी करतात. यामुळे येथील हृदय नागपूर बाहेर जाण्याचे प्रमाण मोठे आहे. आतापर्यंत चेन्नईमध्ये ३, दिल्लीमध्ये १, मुंबईत ९ तर नागपूर विभागात केवळ एकच हृदय प्रत्यारोपण होऊ शकले. विदर्भात फुफ्फुस प्रत्यारोपणाची सोय नाही. यामुळे येथून मुंबई येथे २ तर तेलंगना येथे १ फुफ्फुस पाठविण्यात आले.

-आयसीयूमध्ये ‘ब्रेन डेड’ रुग्णांचे प्रमाण ५ ते १० टक्के

रुग्णालयाच्या प्रत्येक आयसीयूमध्ये महिन्याकाठी ५ ते १० टक्के रुग्ण ‘ब्रेन डेड’ होतात. परंतु त्याचे निदान होत नाही किंवा त्याकडे लक्ष दिले जात नाही. परिणामी, ‘झेडटीसीसी’कडे फार कमी नोंद होते. यामुळे प्रत्येक रुग्णालयाने अवयवदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच अवयवदानासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी जिवंतपणीच लेखी नोंद आपल्या कुटुंबाकडे करणेही तेवढेच गरजेचे आहे.

-डॉ. संजय कोलते, सचिव झेडटीसीसी, नागपूर विभाग

-असे झाले अवयवदान

वर्षे : ब्रेन डेड : मूत्रपिंड: यकृत : हृदय : फुफ्फुसे : नेत्र : त्वचा

२०१३ :०१ :०२ :०० :०० :०० :०० :००

२०१४ :०३ :०५ :०० :०० :०० :०० :००

२०१५ :०४ :०७ :०० :०० :०० :०० :००

२०१६ :०६ :१२ :०१ :०० :०० :०४ :०१

२०१७ :१४ :२४ :१२ :५ :०० :१२ :०५

२०१८ :१८ :३३ :१८ :४ :१ :१२ :०२

२०१९ :१८ :२८ :१६ :३ :२ :०६ :००

२०२० :०३ :०६ :०२ :०० :०० :०३ :००

२०२१ :०६ :१० :०६ :०१ अ०० :०२ :००

एकूण ७३ १२७ :१२५ :१३ :०३ :३९ :०८

Web Title: Organ donation of only 73 donors in 9 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.