भंडाऱ्यातील दात्याचे नागपुरात अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST2021-02-05T04:45:52+5:302021-02-05T04:45:52+5:30
नागपूर : नातेवाइकांच्या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झालेल्या व्यक्तीकडून अवयवदानाचा टक्का वाढत आहे. अनेकांना नवे ...

भंडाऱ्यातील दात्याचे नागपुरात अवयवदान
नागपूर : नातेवाइकांच्या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झालेल्या व्यक्तीकडून अवयवदानाचा टक्का वाढत आहे. अनेकांना नवे आयुष्य मिळत आहे. नव्या वर्षात दुसऱ्यांदा बुधवारी अवयवदान झाले. भंडाऱ्यातील खरवडे कुटुंबाच्या पुढाकाराने तिघांंच्या आयुष्याला नवी उभारी मिळाली.
परसोडी, जवाहरनगर, भंडारा येथील रमेश खरवडे, त्या अवयवदात्याचे नाव. रमेश खरवडे हे भंडाऱ्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीतून सेवानिवृत्त झाले होते. २५ जानेवारीला त्यांना अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला त्यांना भंडारा येथील एका खासगी रुग्णालय आणि नंतर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात २६ जानेवारीला सकाळी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मेंदू मृत झाल्याची माहिती डॉक्टरांच्या चमूने खरवडे कुटुंबीयाना दिली. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉक्टरांनी अवयवदान करण्याचा सल्लाही दिला. रमेश खरवडे यांच्या पत्नी शालिनी, मुले ऋषिकेश, लुकेश आणि विवाहित मुलगी यांनी त्या दु:खातही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन कॉर्डिनेटर वीना वाठोडे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. खरवडे यांचे दोन्ही मृत्रपिंड व यकृताचे दान करण्यात आले.
-१२३वे मृत्रपिंड, तर ५३वे यकृत प्रत्यारोपण
‘झेडटीसीसी’ने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार बुधवारी झालेले मूत्रपिंड प्रत्यारोपण हे १२२-१२३ वे होते. तर, यकृत प्रत्यारोपण ५३वे होते. प्रतीक्षा यादीनुसार ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण होता त्या हॉस्पिटलमधील रुग्णाला यकृत दान करण्यात आले. एक मूत्रपिंड लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमधील ४४ वर्षीय पुरुष रुग्णाला तर दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. रवी देशमुख, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. अमित देशपांडे, डॉ. अमोल कोकास, डॉ. अश्विनी चौधरी यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. नागपूर क्षेत्रांतर्गत २०१३ पासून आतापर्यंत ६९वे अवयवदान होते.