‘त्या’ अतिरेक्यांना हजर ठेवण्याचे आदेश

By Admin | Updated: February 6, 2015 00:54 IST2015-02-06T00:54:03+5:302015-02-06T00:54:03+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-सैलानी येथील दहशतवादी कृत्य प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींवर २१ फेब्रुवारी रोजी दोषारोप निश्चित होणार असून या सर्व आरोपींना न्यायालयात

The order to attend those 'terrorists' | ‘त्या’ अतिरेक्यांना हजर ठेवण्याचे आदेश

‘त्या’ अतिरेक्यांना हजर ठेवण्याचे आदेश

दोषारोप निश्चित होणार: चिखली-सैलानी दहशतवादी कृत्य प्रकरण
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-सैलानी येथील दहशतवादी कृत्य प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींवर २१ फेब्रुवारी रोजी दोषारोप निश्चित होणार असून या सर्व आरोपींना न्यायालयात हजर ठेवण्याचे आदेश गुरुवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने नागपूर दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाला दिले.
सीमी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा सक्रिय कार्यकर्ता जहाल दहशतवादी शाकीर ऊर्फ खलील अकिल खिलजी, अकिल युसुफ खिलजी (४५), जफर हुसैन कुरेशी (३२), मोहम्मद अबरार खान ऊर्फ मुन्ना, अन्वर इब्राहम हुसैन खत्री , अशी या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी अन्वर हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असून बाकीचे आरोपी वेगवेगळ्या कारागृहात आहेत.
आरोपपत्रात एकूण आठ जणांचा समावेश असून त्यापैकी एक चकमकीत ठार झालेला आहे तर दोघे फरार आहेत.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली आणि सैलानी येथे शिबिरे चालवून दहशतवादी कारवाया केल्या प्रकरणी अकोला एटीएसचे पोलीस निरीक्षक केशव श्यामराव पातोंड यांच्या फिर्यादीवरून २७ मार्च २०१२ रोजी भादंविच्या कलम १५३ अ, १२० ब, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलम १०, १३, १५, १६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या दहशतवाद्यांपैकी २६ मार्च २०१२ रोजी औरंगाबाद येथे खलील खिलजी याने पोलीस पथकावर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरात पोलीस पथकानेही दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. परिणामी खलीलच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला होता. आणखी एक दहशतवादी अजहर कुरेशी ऊर्फ वकील कुरेशी हा चकमकीत ठार झाला होता.
एटीएसने मोहम्मद अबरार, अन्वर हुसैन आणि खलील खिलजी यांना अटक केली होती. त्यानंतर सैलानी आणि चिखली येथे सापळा रचून अकिल खिलजी आणि जफर कुरेशी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मुस्लीम तरुणांना चिथावणारे आक्षेपार्ह साहित्य, रिव्हॉल्व्हर आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. हा खटला चालविण्यासाठी सरकारने पी. के. सत्यनाथन यांना विशेष सरकारी वकील नेमले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The order to attend those 'terrorists'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.