निडोजमधील आॅर्केस्ट्रावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:31 IST2017-07-20T01:31:39+5:302017-07-20T01:31:39+5:30
धंतोली पोलिसांनी निडोज बारवर धाड टाकून डान्स बार सुरू असल्याचे उघडकीस आणले आहे.

निडोजमधील आॅर्केस्ट्रावर धाड
परवाना रद्द होणार : २० दिवसांत पाचव्यांदा कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली पोलिसांनी निडोज बारवर धाड टाकून डान्स बार सुरू असल्याचे उघडकीस आणले आहे. निडोज बारविरुद्ध २० दिवसात पाचव्यांदा कारवाई करण्यात आली असून पोलिसांकडून बारचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३० जूनला निडोज बारवर धाड टाकून २.५० लाखाची दारू जप्त केली होती. दारूबंदीविरोधी कायद्यानुसार कारवाई करून बारचे मालक राजू जायसवालला अटक करण्यात आली होती. यामुळे निडोज बार चर्चेत आला होता. त्यानंतर १ जुलैला चालानची कारवाई करण्यात आली. त्यानंतर १५ जुलैला दोनदा चालानची कारवाई करण्यात आली. धंतोली पोलिसांनी चालानची कारवाई केल्यानंतरही निडोजमध्ये आॅर्केस्ट्रा चालविण्यात येत असल्याचे समजल्यामुळे मंगळवारी रात्री ११.४५ वाजता धंतोली पोलिसांनी धाड टाकली. यावेळी तेथे आॅर्केस्ट्रा सुरू होता. आॅर्केस्ट्रासाठी परफॉर्मन्स लायसन्स गरजेचे आहे. धंतोली पोलिसांनुसार जायसवालच्या परफॉर्मन्स लायसन्सची मुदत डिसेंबर २०१६ मध्ये संपली आहे. अशा परिस्थितीत तेथे आॅर्केस्ट्रा चालविता येत नाही. त्यामुळे मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. २० दिवसांत पाचव्यांदा कारवाई झाल्यामुळे निडोजच्या विरुद्ध परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना अवैध दारूच्या अड्ड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही विभागांना त्यात अपयश येत आहे. शहरात छुप्या पद्धतीने अनेक बारमध्ये दारूची विक्री होत आहे. अवैध दारूचे अड्डेही वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी बार आणि हुक्का पार्लरवर धाडी टाकून खळबळ उडविली होती. त्यानंतर गुन्हे शाखा आणि इतर उपायुक्तांनी कारवाईस सुरुवात केली. पोलीस आयुक्तांनीही दारू आणि हुक्का पार्लरवर अंकुश लावण्याचे निर्देश दिले. हुक्का पार्लरच्या संचालकांना व्यवसाय बंद करण्यास सांगण्यात आले. निडोजच्या कारवाईसंदर्भात धंतोलीच्या निरीक्षक सीमा मेहंदाळे यांनी सांगितले की, परफॉर्मन्स लायसन्सअभावी मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. निडोजची पार्श्वभूमी पाहून कारवाई सुरू करण्यात आली आहे.