संत्री मंडीत पोहोचली, व्यापारी कधी येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:56+5:302020-12-02T04:09:56+5:30
शिरीष खोबे नरखेड : यंदा विविध रोगांचा प्रादुर्भाव टाळत शेतातील संत्रा विक्रीसाठी तयार झाला आहे. सोयाबीन, मक्का, कापूस हातचा ...

संत्री मंडीत पोहोचली, व्यापारी कधी येणार?
शिरीष खोबे
नरखेड : यंदा विविध रोगांचा प्रादुर्भाव टाळत शेतातील संत्रा विक्रीसाठी तयार झाला आहे. सोयाबीन, मक्का, कापूस हातचा गेला पण संत्रा साथ देऊ शकतो, अशी आशा बाळगणाऱ्या संत्रा उत्पादकांची चिंता मात्र वाढली आहे. मंडीत संत्रा खरेदीकरिता खरेदीदार नसल्याचे चित्र सध्या नरखेड तालुक्यात आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने आंबिया बहराच्या बाग फुलल्या आहेत. मात्र बागेतील संत्रा व मंडीतील संत्रा विकत घेण्यासाठी कोरोनामुळे विविध राज्यांतील व्यापारी येत नसल्यामुळे संत्रा उत्पादकाची पंचाईत झाली आहे. येथील मंडीतून गत हंगामात ५० ते ६० ट्रक संत्रा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. बांगलादेशात नियमित १२ ट्रक संत्री येथील व्यापारी पाठवायचे. एका हंगामात संत्र्याची उतारी, छाटणी, भराई याकरिता परिसरात हजार ते बाराशे मजूर राबायचे. त्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन मंडीतील हंगामावर अवलंबून राहत असे. परंतु मंडीतील खरेदी-विक्रीचे व्यवहारच २० टक्क्यांवर आल्याने शेतकरी, स्थानिक व्यापारी, अडते, मजूर, छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. विविध राज्यातील स्थानिक बाजारपेठा बंद असल्यामुळे संत्र्याला उठाव नाही. त्यामुळे २२ ते २५ हजार रुपये टन विकला जाणारा संत्रा सध्या १० ते १२ हजार रुपये टन या दराने विकला जात आहे. केरळला पाठविलेला पाच ट्रक संत्रा तीन दिवसापासून रिकामा झाला नाही. ट्रक भरून पाठविताना सोबत भाडेसुध्दा द्यावे लागते अशीही ओरड स्थानिक व्यापाऱ्यांची आहे. यासोबतच संत्र्याची ढेरी लावल्यानंतर खेर संत्रा निघत होता. तो संत्रा स्थानिक हॉकर विकत घेऊन इटारसी, नागपूर, बडनेऱ्यापर्यंत रेल्वेत विकायचे. पण मोठ्या प्रमाणात रेल्वेगाड्या बंद असल्याने व कोरोनामुळे स्थानकावर हॉकर्सना प्रवेशबंदी घालण्यात आल्याने खेर संत्रासुद्धा फेकून द्यावा लागतो आहे.
----
देशातील बाजारपेठेत संत्र्याला मागणी नाही. त्यामुळे खरेदी मंदावली आहे. यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास मागणी वाढू शकते.
हाजी बब्बू मिया, वाराणसीचे ठोक व्यापारी.