विरोधी बाकावरील आसन व्यवस्था बदलणार
By Admin | Updated: December 6, 2014 02:26 IST2014-12-06T02:26:17+5:302014-12-06T02:26:17+5:30
ऐन अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने सरकार स्थिर झाले असले तरी, नवा विरोधी पक्ष नेता निवडण्यापासून

विरोधी बाकावरील आसन व्यवस्था बदलणार
चंद्रशेखर बोबडे नागपूर
ऐन अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने सरकार स्थिर झाले असले तरी, नवा विरोधी पक्ष नेता निवडण्यापासून तर विरोधी बाकावरील पहिल्या रांगेतील सदस्यांच्या आसन व्यवस्थेतही अंशत: फेरबदल करावा लागणार आहे.
यासंदर्भात असलेल्या नियमानुसार विधानसभा अध्यक्ष याबाबत निर्णय घेतील व त्यानंतर सचिवालयाकडून व्यवस्था केली जाईल. पण तोपर्यंत तरी अनिश्चिततेचे सावट कायम आहे.
विधानसभेत विरोधी बाकावरील पहिल्या रांगेतील आसनावर कोण बसणार, यासंदर्भात असलेल्या नियमानुसार या आसनांचे वाटप केले जाते. फडणवीस सरकार सत्तारूढ झाल्यावर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतल्याने त्यानुसार नागपूर अधिवेशनासाठी सचिवालयाने आसन वाटपाचे नियोजन केले होते. त्यानुसार विधानसभेचे उपाध्यक्ष, विरोधी पक्ष नेता, संख्या बळानुसार सेना तीन व काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि एक जागा ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुखांसाठी आरक्षित होती. आता शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने चित्र बदलले. विरोधी पक्ष नेता आणि उपाध्यक्षांची निवड अद्याप झालेली नाही. तसेच पहिल्या रांगेतील सेनेच्या वाट्याचे आसनही रिक्त होतील. त्यामुळे यासाठी फेरनियोजन करावे लागणार आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येतात, हे सभापतींच्या निर्णयावरच अवलंबून असणार आहे.
विरोधी पक्ष नेता कोणत्या पक्षाचा होतो, यावरही त्या पक्षाच्या सदस्यांची पहिल्या रांगेतील सदस्यांची संख्या ठरणार आहे. नव्या फेररचनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची पहिल्या रांगेतील संख्येत वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.