ईव्हीएममधील घोळाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा
By Admin | Updated: March 3, 2017 02:59 IST2017-03-03T02:59:33+5:302017-03-03T02:59:33+5:30
राज्यात महापालिका व जिल्हा परिषदांची निवडणूक नुकतीच झाली आहे. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग

ईव्हीएममधील घोळाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी
नागपूर : राज्यात महापालिका व जिल्हा परिषदांची निवडणूक नुकतीच झाली आहे. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) गडबड केल्याचा आरोप करीत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. गुरुवारी नागपुरातही ईव्हीएम हटाव, संविधान बचाव अशा घोषणा देत ‘सर्व दलीय प्रजातंत्र बचाओ’ समितीच्या वतीने चिटणवीस पार्क ते संविधान चौक असा मोर्चा काढून मतपत्रिकाद्वारेच फेरमतदान घेण्याची मागणी करण्यात आली.
ईव्हीएममध्ये सेटिंग करून भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याचा आरोप काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, एमआयएम, राष्ट्रीय जनता दल आदी पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी केला आहे. ईव्हीएममध्ये घोळ केल्याने याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी. बहुसदस्यीय प्रभाग पध्दती बंद करण्यात यावी. मतदार यादीतील घोळ लक्षात घेता याद्यांचे शुद्धीकरण करण्यात यावे, झालेले मतदान व मतमोजणीच्या वेळची मते यात मोठ्या प्रमाणात फरक असल्याने फेरमतदान घेण्यात यावे. अशी आग्रही मागणी करण्यात आली. मोर्चात ५० पराभूत उमेदवार व पक्षाचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चात माजी मंत्री अनिस अहमद, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन, विशाल मुत्तेमवार, नगरसेवक बंटी शेळके, रमण ठवकर, सुरेश जग्याशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश हरडे, बंडू तळवेकर, किशोर पराते, चिंटू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ईश्वर बाळबुधे, एमआयएमचे शकील अहमद पटेल, राजदचे कुमार पंचबुधे, तसेच असलम मुल्ला, सुभाष मानमोडे, किशोर डोरले, विकास खोब्रागडे, मीना तिडके, शेख अजीज शेख अजीज, तौसिक अहमद, मिलिंद सोनटक्के, रवी गाडगे पाटील, वंदना इंगोले, जयश्री जांभुळे आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना मागण्याचे निवेदन सादर करून चर्चा केली. (प्रतिनिधी)
फेरनिवडणूक घेण्यात यावी
प्रभाग क्रमांक १ मधील मतदान केंद्रावर ईव्हीएम क्रमानुसार ठेवण्यात आलेल्या नव्हत्या. मतदार यादीतही मोठ्या प्रमाणात घोळ केला. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात टाकण्यात आली, अशी माहिती उमेदवार नितीन नागदेवते यांनी दिली. मी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा मतदारसूचीनुसार माझा अनुक्रमांक ४१२९ होता. परंतु मतदानाच्या दिवशी मतदार यादीत माझा अनुक्रमांक ७२५ होता. या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीत घोळ केल्याने फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी नागदेवते यांनी केली.
मतमोजणीसाठी याचिका दाखल
मतमोजणीच्या दिवशी सहाव्या फेरीत जेवणाची वेळ झाली म्हणून माझ्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्राबाहेर जाण्यास सांगितले. संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतरच आम्ही बाहेर जाऊ असे प्रतिनिधींनी सांगितले. परंतु केंद्रावरील तैनात पोलिसांनी त्यांना केंद्राबाहेर काढले. त्यानंतर सातव्या व आठव्या फेरीची मतमोजणी करून निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती मोर्चात सहभागी असलेले पराभूत उमेदवार अनिल वाघमारे यांनी दिली. याचिका टाकण्यासाठी प्रमाणित प्रत मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागल्या. अखेर आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर सत्यप्रत देण्यात आली. फेरमतमोजणीसाठी न्यायालयात अर्ज केल्याची माहिती त्यांनी दिली.