विरोधकांसह सत्तापक्षातील आमदारांचे उपोषण

By Admin | Updated: December 18, 2015 03:27 IST2015-12-18T03:27:41+5:302015-12-18T03:27:41+5:30

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळात गेला. कर्जमाफीच्या मुद्यावरून मागील आठवड्यात विरोधकांनी विधानभवन परिसरात निदर्शने, आंदोलन केले.

With the opposition, the members of the ruling party's fasting fast | विरोधकांसह सत्तापक्षातील आमदारांचे उपोषण

विरोधकांसह सत्तापक्षातील आमदारांचे उपोषण

अधिवेशन गाजतेय आंदोलनाने : घोषणाबाजी, निदर्शने, नारेबाजीने परिसर दणाणला
गणेश खवसे नागपूर
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळात गेला. कर्जमाफीच्या मुद्यावरून मागील आठवड्यात विरोधकांनी विधानभवन परिसरात निदर्शने, आंदोलन केले. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासूनच यामध्ये आणखी भर पडली. गुरुवारी तर विरोधकांसह सत्तापक्षातील आमदारांनीही घोषणाबाजी, निदर्शने आणि उपोषण केले. एकूणच काय तर सत्तापक्षातील आमदारांनाही आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मागण्यांसाठी विविध संघटनांच्या वतीने मोर्चे काढले जात आहेत. विधानभवनाच्या बाहेर हे चित्र असताना विधानभवन परिसरातही आमदारांनी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन, उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. विधानभवन परिसरात गुरुवारी एकूण पाच आंदोलन, उपोषण करण्यात आले. भिवंडीकरांच्या न्यायासाठी टोरंट पॉवर कंपनीसोबतचा करार रद्द करावा, नागरिकांवर कंपनीने लावलेल्या केसेस मागे घेण्यात याव्या, टोरंट कंपनीला मुदतवाढ न देता काळ्या यादीत समाविष्ट करावे आदी मागण्यांसाठी भिवंडी पूर्वचे आ. रूपेश म्हात्रे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषण केले. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी त्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाशी संबंधित हा प्रश्न असल्याने त्यांना हा प्रकार सांगण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर पुन्हा त्यांनी आ. म्हात्रे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. उपोषणानंतर म्हात्रे यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांना निवेदन सोपविले.
दुसरे उपोषण कणकवलीचे आ. नीतेश राणे यांनी केले. देवगड-जामसंडे येथील लोकसंख्या ५० हजारांहून अधिक असून पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याने तेथे पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देवगड-जामसंडे येथे अतिरिक्त पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी, या मागणीसाठी आ. राणे यांनी उपोषण केले. त्यांनी कोरडे माठ आणून या आंदोलनाकडे लक्ष वेधले. दरम्यान, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी त्यांची भेट घेतली. त्यावर नगरोत्थान योजनेतून व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन पाणीपुरवठा मंत्र्यांनी देत ज्यूस पाजून हे उपोषण संपविले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज हे फसवे असून कर्जमाफीची घोषणा करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवन परिसरात नारेबाजी करीत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, सुमन पाटील, विद्या चव्हाण, सुनील तटकरे, राजेश टोपे, प्रकाश गजभिये यांच्यासह इतर आमदार सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त नागपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन हजार आसन क्षमतेचे ‘वसंतराव नाईक स्मृती सभागृह’ उभारण्यास आघाडी शासनाने मंजुरी दिली होती. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली असून तो निधी तसाच पडून आहे. त्या निधीचा उपयोग करून नागपूरच्या राजभवनात प्रस्तावित जागेत ते सभागृह बांधण्यात यावे, या मागणीसाठी आ. हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात माणिकराव ठाकरे, जोगेंद्र कवाडे, हुस्नबानो खलिफे, रामहरी रूपनवार आदी सहभागी झाले होते.

‘हर हर महादेव’च्या घोषणा
‘एनसीईआरटी’ निर्मित ‘सीबीएसई’च्या सातवी, दहावी आणि बारावीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अल्प इतिहास नमूद केल्याने शिवसेनेचे आमदार संतप्त होत त्यांनी परिसरात घोषणाबाजी केली. ते पुस्तक रद्द करा अशी मागणी करीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव’च्या घोषणा आमदारांनी केल्या. यामध्ये भारत गोगावले, किशोर अप्पा पाटील, मनोहर भोईर, रूपेश म्हात्रे, राजन साळवी, वैभव नाईक, सदानंद चव्हाण, उदय सामंत, शांताराम मोरे, प्रताप सरनाईक आदी सहभागी झाले होते.

Web Title: With the opposition, the members of the ruling party's fasting fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.