कोरोनाबाधित असल्याचे सांगत वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:10+5:302021-04-04T04:08:10+5:30
कोंढाळी : कोरानामुळे रक्ताची नाते दुरावल्याचे आपण अनुभवतो. पण, हिंगणा तालुक्यातील गिदमगड येथे एका महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्यानंतर ती ...

कोरोनाबाधित असल्याचे सांगत वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराला विरोध
कोंढाळी : कोरानामुळे रक्ताची नाते दुरावल्याचे आपण अनुभवतो. पण, हिंगणा तालुक्यातील गिदमगड येथे एका महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्यानंतर ती कोरोनाबाधित असल्याचे सांगत गावातील काही मंडळींनी तिच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शविल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. शेवटी पोलिसांच्या मदतीने या वृद्ध महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुशीला वृद्धाराव रंगारी (७०, रा. गिदमगड, ता. हिंगणा) असे मृत महिलेचे नाव आहे. हे गाव कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. सुशीला रंगारी या मूळच्या सिवनी (ता. कामठी) येथील होत्या. गत काही वर्षांपासून जावाई शरद एकनाथ भाजीखाये यांच्याकडे त्या राहत होत्या. सुशीला रंगारी यांचे शनिवारी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. पण, गिदमगड गावातील काही लोकांनी महिलेचा मृत्यू कोरोनाने झाला असल्याचे सांगत गावातील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करू देण्यास विरोध केला. याबाबतची माहिती गावातील काही लोकांनी कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांना दिली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र सोनावले गिदमगड येथे दाखल झाले. पोलिसांनी कागदपत्रांची पाहणी केली असता, सुशीला रंगारी यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह होता. कोंढाळी पोलीसांनी गिदमगडचे सरपंच कृष्णा नत्थू बोरकर व पोलीस पाटील रामदास लक्ष्मण खंडागळे यांच्या उपस्थितीत गावातील स्मशानभूमीत संबंधित महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.