किंमतकरांना ‘रामटेक भूषण’ देण्यास विरोध का?
By Admin | Updated: November 19, 2015 03:38 IST2015-11-19T03:38:18+5:302015-11-19T03:38:18+5:30
रामटेक नगरपालिकेच्यावतीने दिला जाणारा पहिलाच ‘रामटेक भूषण’गौरव पुरस्कार माजी मंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर यांना दिला जाणार आहे.

किंमतकरांना ‘रामटेक भूषण’ देण्यास विरोध का?
रामटेक : रामटेक नगरपालिकेच्यावतीने दिला जाणारा पहिलाच ‘रामटेक भूषण’गौरव पुरस्कार माजी मंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर यांना दिला जाणार आहे. माजी नगरसेवक दामोदर धोपटे यांनी नेमके किंमतकरांनी रामटेकसाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून वादाला तोंड फोडले आहे.
रामटेक नगरपालिकेने नुकताच रामटेक भूषण पुरस्कार देण्याचा ठराव केला. हा पुरस्कार रामटेक शहरात जन्मलेल्या आणि विशेष कामगिरी करणाऱ्या रामटेककराला दिला जाणार आहे. पालिकेच्यावतीने हा पहिला पुरस्कार माजी मंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर यांना दिला जाणार आहे. रामटेक पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. या पुरस्कारासंबंधात बोलताना नगराध्यक्षा नलिनी चौधरी आणि उपाध्यक्ष रमेश कारामोेरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून रामटेक पालिकेने ‘रामटेक भूषण गौरव पुरस्कार’ देण्याचा ठराव केला. हा पुरस्कार रामटेकमध्ये जन्मलेल्या आणि विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणार आहे. रामटेक भूषण पुरस्कार दुसऱ्या कुठल्याही संस्थेला किंवा व्यक्तीला यापुढे सुरू करता येणार नाही. हा पुरस्कार दरवर्षी दिलाच पाहिजे असेही नाही. पुरस्कारयोग्य व्यक्ती मिळाल्यावरच हा पुरस्कार दिला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. हा पहिला पुरस्कार देताना निवड समितीपुढे किंमतकरांशिवाय दुसरे कुठलेही नाव नव्हते आणि या पुरस्काराला काँग्रेसच्या नगरसेवकांसह सर्वसंमतीने किंमतकरांच्या नावाची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अॅड. किंमतकरांनी रामटेक शहराच्या विकासाकरिता मंत्री असताना आणि नसतानादेखील सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला. तसेच रामटेक पालिकेला विदर्भ वैधानिक मंडळाचादेखील सर्वाधिक निधी किंमतकरांनी उपलब्ध करून दिला. राज्यात अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून किंमतकरांचे नाव आदराने घेतले जाते. रामटेकच्या ग्रामीण भागात सिंचनाची सोय व्हावी म्हणून किंमतकरांनी सिंचन योजनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले, त्यांचे अथक प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे आदिवासी भागात पाणी पोहोचले. रामटेक पालिकेने किंमतकरांना रामटेक भूषण पुरस्कार दिला म्हणजे ते मोठे होतील असे अजिबात नाही तर त्यांच्यामुळे पुरस्कार मोठा होईल. किंमतकरांनी केलेल्या कार्याला पक्षाच्या चौकटीत बांधले जाऊ शकत नाही, असे मत यावेळी नगराध्यक्षा चौधरी आणि उपाध्यक्ष कारामोरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
धोपटे यांनी केलेल्या आरोपांकडे नगराध्यक्ष चौधरी आणि उपाध्यक्ष कारामोरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की किंमतकरांची उंची काय हे सर्व महाराष्ट्र जाणतो. त्यांना पहिला रामटेक भूषण पुरस्कार देणे हा पालिकेचा आणि पुरस्कार या दोहोंचाही सन्मान आहे. पुरस्कारासाठी घातलेल्या अटी तपासून पाहिल्या तर रामटेकमध्ये जन्मलेल्या व्यक्तीलाच तो दिला जाणार आहे. किंमतकरांवर आरोप करणाऱ्या माणसाची उंची तेवढी असली पाहीजे. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपाला आणि त्या आरोप करणाऱ्या व्यक्तीला फार गंभीर घ्यायची आवश्यकता नाही. किंमतकरांवर आरोप करण्याची त्यांची पात्रता तरी आहे का?असा चिमटा त्यांनी काढला.
धोपटेंचा बोलविता धनी नेमका कोण? हे धोपटेंनी स्पष्ट करावे असेही कारामोरे म्हणाले. यासंबंधात किंमतकरांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की मला कोणत्याही पुरस्काराचे अप्रुप राहिलेले नाही. मला पुरस्कार नगरपालिका देणार आहे शिवसेना नाही.(प्रतिनिधी)