मेट्रो रेलमध्ये विद्यार्थ्यांना संधी
By Admin | Updated: February 12, 2016 03:17 IST2016-02-12T03:16:05+5:302016-02-12T03:17:11+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल योजनेचे काम जोरात सुरू आहे.

मेट्रो रेलमध्ये विद्यार्थ्यांना संधी
ब्रिजेश दीक्षित : शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ
नागपूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल योजनेचे काम जोरात सुरू आहे. मेट्रो रेल्वेमुळे नागपुरातील नागरिकांना सुविधा मिळणारच आहे, त्याचबरोबर स्थानिक तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचे नागपूर मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. शासकीय तंत्रनिकेतनच्या १८ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
शासकीय तंत्रनिकेतन, नागपूरचा १८ वा दीक्षांत समारंभ ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, नागपूर मेट्रो रेल्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुलाबराव ठाकरे, सहसंचालक, तंत्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. याप्रसंगी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात, परीक्षा नियंत्रक योगेश दुपारे, प्रभागी अधिकारी दीपक कुळकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी दीक्षित म्हणाले की, नागपूर मेट्रो रेल योजनेत टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येईल. यासाठी व्हीएनआयटीसारख्या संस्थेसोबत समन्वय साधून करिअरच्या क्षेत्रात प्रयत्न केले जातील. या समारंभात ७१२ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. संस्थेतील सर्व अभियांत्रिकी शाखांच्या प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्ण व रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे प्रायोजित पुरस्कारही प्रदान करण्यात आले. यंत्र अभियांत्रिकी विभागातील गौरव राजाभाऊ आरेकर या विद्यार्थ्याने ९३.१९ टक्के गुण प्राप्त करून सर्वच विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याला सर्वात जास्त आठ प्रायोजित पारितोषिक व सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. दुसरा क्रमांक वस्त्रनिर्माण तंत्रज्ञान शाखेतील यश लक्ष्मीचंद शाहू या विद्यार्थ्याने पटाकाविला त्याला ८९.५० टक्के गुण आहेत. त्यालाही तीन प्रायोजित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुवर्ण पदकाचे मानकरी अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकीची विद्यार्थिनी प्रिया आनंद रुथीया, स्वयंचलन अभियांत्रिकीचा विद्यार्थी अमोल दिलीप फुलझेले, वेष्टण तंत्रज्ञानचा विद्यार्थी यश ओमप्रकाश दीक्षित, धातूशास्त्र अभियांत्रिकीचा आनंद बाबूसिंग कुचावह, स्थापत्य अभियांत्रिकीची विद्यार्थिनी दर्शना ज्ञानेश्वर नंदनवार, माहिती तंत्रज्ञान शाखेची विधी राजेंद्र जोशी, विद्युत अभियांत्रिकीचा अजिंक्य नरहरी पंचबुद्धे, आदित्य नरहरी पंचबुद्धे, मायनिंग अॅण्ड मायनिंग सर्व्हे अभियांत्रिकीचा गौरव मधुकर ब्राम्हणकर, संगणक अभियांत्रिकी शाखेची आदिती शिरीष देशमुख, प्रवास व पर्यटन शाखेचा महेश रामदास हिंगवे ठरले. रौप्य पदकाची मानकरी स्थापत्य अभियांत्रिकीची दीपाली मनोहर चापले ठरली. (प्रतिनिधी)