‘रामराज्य’ संकल्पनेवर प्रखर चर्चेची हीच संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:10+5:302021-02-05T04:47:10+5:30
- अमिश त्रिपाठी : ‘इक्ष्वाकू वंशाचे प्रभू श्रीराम’ या विषयावरील व्याख्यान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रामराज्य असेच असावे, ...

‘रामराज्य’ संकल्पनेवर प्रखर चर्चेची हीच संधी
- अमिश त्रिपाठी : ‘इक्ष्वाकू वंशाचे प्रभू श्रीराम’ या विषयावरील व्याख्यान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामराज्य असेच असावे, अशी संकल्पना कुठेही स्पष्ट नाही. ज्या कथा पुराणांतून ऐकल्या, वाचल्या त्यावरूनच रामराज्य कसे असावे, ही इच्छा दृढमूल झाली. आता अथक संघर्षानंतर अयोध्येत राममंदिर साकारले जात आहे. त्यामुळे, वर्तमानाला रामराज्य या संकल्पनेवर प्रखर चर्चेची संधी प्राप्त झाली आहे आणि त्याचा लाभ घेण्याचे आवाहन लंडन येथील नेहरू सेंटरचे संचालक व प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांनी केले.
कोरोना व टाळेबंदीनंतर मंथनच्या वतीने आयोजित या पहिल्याच कार्यक्रमात त्रिपाठी ‘इक्ष्वाकू वंशाचे प्रभू श्रीराम’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधत होते. हा कार्यक्रम सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये पार पडला.
प्रत्येकासाठी रामराज्याची संकल्पना वेगळी असेल, असू शकते. इक्ष्वाकू हे उदात्त अशा सूर्यवंशाचे संस्थापक होते आणि त्याच कुळात राम जन्माला आले म्हणून त्यांना इक्ष्वाकूचे वंशज म्हटले जाते, हे स्पष्टच आहे. मात्र, श्रीरामाने जपलेला घराण्याचा आदर्श, संस्कार हे महत्त्वाचे ठरतात आणि त्यामुळेच, त्यांच्या कार्यकाळात निर्माण झालेला राजाचा आदर्श हीच रामराज्य संकल्पना म्हणून दृढ झाली. रामायणाच्या घटनेबाबतही अनेक कल्पना आहेत. थाई लोक रामायण थायलंडमध्येच घडले, असे मानतात. आजच्या काळात राम हे कसे आदर्श ठरतील, याबाबत साशंकता आहे. दीर्घकाळापासून भारतात विभिन्न अशा घटना घडल्या आणि त्या पार्श्वभूमीवर राम कसा असावा किंवा राम हेच आदर्श आहेत असे सांगणे कठीण जाईल, असे अमिश त्रिपाठी यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन अंकिता देशकर यांनी केले. रोहन पारेख व सागर मिटकरी यांनी प्रश्नोत्तराच्या सत्राचे संचालन केले. सतीश सारडा यांनी आभार मानले.
...........