परवाना शुल्क वाढीला आॅटोचालकांचा विरोध

By Admin | Updated: February 24, 2016 03:25 IST2016-02-24T03:25:42+5:302016-02-24T03:25:42+5:30

महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये सुधारणा करुन शासनाने नवी अधिसूचना काढली आहे. यात वाहन परवाना शुल्कात १० ते १०० पट वाढ केली आहे.

Opponents oppose license fee increase | परवाना शुल्क वाढीला आॅटोचालकांचा विरोध

परवाना शुल्क वाढीला आॅटोचालकांचा विरोध

अध्यादेश मागे घ्या, अन्यथा आंदोलन : विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनचे धरणे
नागपूर : महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये सुधारणा करुन शासनाने नवी अधिसूचना काढली आहे. यात वाहन परवाना शुल्कात १० ते १०० पट वाढ केली आहे. ही वाढ आॅटोचालकांचे कंबरडे मोडणारी आहे. शासनाने हा अध्यादेश मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनच्यावतीने मंगळवारी संविधान चौकात आयोजित धरणे आंदोलनातून दिला.
फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी सांगितले, विदर्भातील ११ जिल्ह्यातील आॅटोरिक्षा चालकांची आर्थिक व व्यावसायिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. यातच अवैध प्रवासी वाहतुकीमुळे आॅटोचालकांना प्रवासी मिळणे कठीण जात आहे. ई-रिक्षा, कॅब, सहा आसनी आॅटोरिक्षा व खासगी आॅटोरिक्षामुळे अधिकृत आॅटोचालकांना आॅटोरिक्षा चालविणे कठीण झाले आहे.
यातच नव्या अध्यादेशानुसार आता पूर्वी आॅटोरिक्षा परवान्याच्या नुतनीकरणाला २०० रुपये शुल्क आकारले जायचे ते आता नव्या आदेशाप्रमाणे १००० रुपये झाले आहे. मासिक दंडाचे १०० रुपये शुल्क असताना ते ५००० रुपये दंड निर्धारित करण्यात आले आहे. परमिट न घेणाऱ्यांना पूर्वी २०० रुपये शुल्क होते ते आता १० हजार रुपये करण्यात आले आहे. हा अध्यादेश विदर्भातील आॅटोचालकांवर अन्याय करणार आहे. शासनाने या अधिसूचनेतून आम्हाला वगळावे, अशी मागणी आहे, असेही ते म्हणाले.
धरणे आंदोलनात ६०० आॅटोचालकांचा सहभाग होता. या आंदोलनानंतर फेडरेशनचे शिष्टमंडळ विलास भालेकर यांच्या नेतृत्वात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांना भेटून मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महासचिव रविशंकर रामटेके, आनंद चौरे, मुकुंदा उईके, राजेंद्र खांडेकर, हेमराज मुनेश्वर, अरुण हिरेखन, संजय मेश्राम, देवा निखाडे, इलियास लोधी, राजू पडगिलवार, मनोज डांगे, सुदाम बोरकर, पप्पू मिश्रा, अब्बास भाई, सुशील समुद्रे, इस्तारी कावळे, फारुख शेख, फिरोज पठाण, सुभाष गायकवाड, संजय तागडे, बाबू गणवीर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Opponents oppose license fee increase