आॅपरेशन याकूब
By Admin | Updated: July 29, 2015 03:13 IST2015-07-29T03:13:16+5:302015-07-29T03:13:16+5:30
सर्वोच्च न्यायालयात याकूब मेमनच्या याचिकेवर मंगळवारीदेखील निर्णय झाला नाही.

आॅपरेशन याकूब
स्थानिक यंत्रणा आणखी अस्वस्थ : आता बुधवारकडे लक्ष
नागपूर : सर्वोच्च न्यायालयात याकूब मेमनच्या याचिकेवर मंगळवारीदेखील निर्णय झाला नाही. ही याचिका सुनावणीसाठी आता वरिष्ठ न्यायपीठाकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे ‘आॅपरेशन याकूब‘मध्ये गुंतलेली स्थानिक यंत्रणा आणखी अस्वस्थ झाली आहे. बुधवारी आता काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याकूबचा नातेवाईक उस्मान मेमन याने मंगळवारी पुन्हा कारागृहात जाऊन याकूबची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
२१ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने याकूबची क्युरेटीव्ह पिटीशन खारीज केली. याच दिवशी याकूबने राज्यपालांकडे दयेचा अर्ज सादर केला. तर, क्युरेटीव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयात दाखल असतानाच डेथ वॉरंट काढण्यात आल्यामुळे तो बेकायदेशीर असल्याचे सांगून फाशी टाळण्यासाठी त्याने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार होती. त्यामुळे ‘आॅपरेशन याकूब‘च्या अंमलबजावणीच्या तयारीत गुंतलेल्या यंत्रणेसह जनसामान्यांचेही लक्ष आजच्या सुनावणीकडे वेधले गेले होते. मात्र, न्यायमूर्तीद्वयांकडून मतभिन्नता नोंदवल्या गेल्यामुळे ही याचिका वरिष्ठ न्यायपीठाकडे वर्ग झाली.
परिणामी स्थानिक यंत्रणा आणखी अस्वस्थ झाली आहे. दुसरीकडे याकूबचा नातेवाईक उस्मान मेमन आज दुपारी ४.१५ च्या सुमारास कारागृहात गेला. त्याने याकूबची प्रदीर्घ भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारागृह परिसरात आणि बाहेरही पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला होता.
पोलिसांचे विशेष सशस्त्र पथक बाहेरच्यांवर नजर ठेवून होते. राहाटे कॉलनीकडून येणाऱ्या मार्गावर असलेल्या कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी बॅरिकेटस लावले होते. संशयित व्यक्ती आणि वाहनाचा ते कसून तपास करीत होते.(प्रतिनिधी)