योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसह देशाला न्याय मिळाला आहे. तसेच या ‘ऑपरेशन’मुळे देशाचा स्वाभिमान व मनोबल वाढले आहे या शब्दांत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भावना व्यक्त केली आहे.
पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणेवर निर्णायक कारवाई केल्याबद्दल आम्ही केंद्र सरकारच्या नेतृत्वाचे आणि आमच्या सशस्त्र दलांचे अभिनंदन करतो. हिंदू पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडात पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय देण्यासाठी केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि मनोबल वाढले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर, त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थन यंत्रणेवर लष्करी कारवाई करणे आवश्यक आणि अपरिहार्य आहे यावर आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी भावनेने आणि कृतीने उभा आहे. भारताच्या सीमेवरील धार्मिक स्थळांवर आणि नागरी वस्तीवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो आणि या क्रूर, अमानवी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे सरसंघचालक व सरकार्यवाह यांनी प्रतिपादन केले.
सामाजिक सौहार्द बिघडविण्याचे प्रयत्नया आव्हानात्मक काळात नागरिकांनी सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे. तसेच नागरी कर्तव्य पार पाडताना सर्वांनी सावध राहिले पाहिजे. देशविरोधी तत्वांकडून सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे प्रयत्न होऊ शकतात. मात्र कुठलेही राष्ट्रविरोधी षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नये. नागरिकांनी आवश्यकतेनुसार सैन्य आणि नागरी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार राहावे. तसेच राष्ट्रीय एकता आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्व प्रयत्नांना बळकटी द्यावी, असे आवाहन सरसंघचालक व सरकार्यवाहांनी केले आहे.