मुक्त विद्यापीठाचे धडे ‘स्मार्टफोन’वर
By Admin | Updated: November 5, 2014 00:56 IST2014-11-05T00:56:05+5:302014-11-05T00:56:05+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सकारात्मक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अगदी कुठेही, कधीही अभ्यास करता यावा यासाठी

मुक्त विद्यापीठाचे धडे ‘स्मार्टफोन’वर
कुलगुरू साळुंखे यांची माहिती : महागड्या अभ्यास साहित्याला ‘टॅब’चा पर्याय
नागपूर: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सकारात्मक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अगदी कुठेही, कधीही अभ्यास करता यावा यासाठी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून शैक्षणिक धडे देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून काही निवडक अभ्यासक्रमांपासून ही ‘हायटेक’ सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दिली.
कुलगुरू डॉ. साळुंखे हे नागपूर विभागीय केंद्राच्या पाहणीसाठी उपराजधानीत आले होेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज ‘स्मार्टफोन’चे युग आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे फोन उपलब्ध असतो. अशा स्थितीत त्यांना शिक्षकांचे धडे तसेच समुपदेशन थेट मोबाईलमार्फतच मिळण्याची सोय करण्यात येणार आहे असे साळुंखे यांनी सांगितले. शिवाय अनेक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना महागडे शिक्षण साहित्य विकत घ्यावे लागते. हे साहित्य ‘टॅब’च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांकडे जुने अभ्यास साहित्य उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कातून अध्ययन साहित्याची रक्कम वजा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
शिक्षणाचा दर्जा टिकून रहावा यावर मुक्त विद्यापीठाकडून भर देण्यात येत आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सुमारे १०० अभ्यासक्रमांची आतापर्यंत जवळपास ५०० पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत पुस्तके उपलब्ध होत नाहीत. अशा स्थितीत त्यांना अभ्यासासाठी ‘आॅनलाईन’ पर्याय राहील, असे ते म्हणाले. मुक्त विद्यापीठाची ज्ञानगंगा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागपूर विभागीय केंद्रात यंदाच्या वर्षी ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. परंतु यावर मी समाधानी नसून हा आकडा एक लाखाच्या वर गेला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. विभागीय केंद्राचे संचालक डॉ. रमेश सेनाड यावेळी उपस्थित होते.
निकाल प्रक्रिया वेगवान करणार
मुक्त विद्यापीठाचे निकाल वेळेवर लागत नाही, विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर लवकर उत्तर देण्यात येत नाही, अशा बाबी वारंवार दिसून येतात. त्यामुळे सर्व अभ्यासकेंद्रांच्या माध्यमातून अशा तक्रारी विभागीय संचालकांकडे येतील व लगेच त्यांचा निपटारा करण्यात येईल अशी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. शिवाय परीक्षांची निकाल प्रक्रिया आणखी वेगवान करण्यावर भर आहे. आगामी वर्षापासून पुनर्मूल्यांकन पद्धत सुरू केली जाईल, असे डॉ.साळुंखे यांनी सांगितले. नागपुरात प्रशासकीय इमारत उभारण्यासंदर्भात विचार सुरू असून जिल्हा केंद्रदेखील उभारल्या जातील असे बोलून दाखविले. (प्रतिनिधी)
वंचित घटकांसाठी १०० टक्के फी माफी
मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी १०० टक्के फी माफी देण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. शासनाने यासंदर्भात ‘जीआर’ काढला होता व केंद्र शासनाकडून याअंतर्गत निधी देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याअगोदरच शुल्क भरले आहे, त्यांनी समाजकल्याण खात्याकडे सर्व कागदपत्रांसह ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल केल्यास त्यांना शुल्काचा परतावा मिळेल, असे डॉ.साळुंखे यांनी स्पष्ट केले. शिक्षणापासून दुरावलेल्यांना उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम अत्यंत उपयुक्त असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा यासाठी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ मोठ्या प्रमाणात घेता यावा यासाठी भर देणार असल्याचे डॉ. साळुंखे म्हणाले.