नायलॉन मांजाच्या भीतीमुळे गोरेवाडात खुली जिप्सी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:48+5:302021-01-19T04:10:48+5:30

नागपूर : शहरालगत असलेल्या गोरेवाडातील जंगल सफारीवर सध्या पतंगबाजांची आणि नायलॉन मांजाची दहशत पसरली आहे. परिसरात असलेल्या लगतच्या वस्तीमधून ...

Open gypsy closes in Gorewada for fear of nylon cats | नायलॉन मांजाच्या भीतीमुळे गोरेवाडात खुली जिप्सी बंद

नायलॉन मांजाच्या भीतीमुळे गोरेवाडात खुली जिप्सी बंद

नागपूर : शहरालगत असलेल्या गोरेवाडातील जंगल सफारीवर सध्या पतंगबाजांची आणि नायलॉन मांजाची दहशत पसरली आहे. परिसरात असलेल्या लगतच्या वस्तीमधून पतंगबाजांच्या कटलेल्या पतंग येतात. त्यामुळे पर्यटकांना संभाव्य धोका टाळण्यासाठी आता तिथे खुल्या जिप्सीऐवजी बंद वाहनातून फिरण्याचा निर्णय गोरेवाडा प्रशासनाने घेतला आहे.

गोरेवाडा जंगलालगतच रहिवासी वस्त्या आहेत. सध्या पतंगबाजीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे कटलेल्या पतंग थेट या परिसरात येतात. सफारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी मांजा अडकून असल्याचे गोरेवाडा प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर खुल्या जिप्सीतून फिरणाऱ्या पर्यटकांना धोका होऊ शकतो याची कल्पना आली. त्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आला.

सध्या फक्त खासगी वाहनांनाच सफारीची परवानगी देण्यात आली आहे. या वाहनातून जाणारे गाइड, वनमजूर आणि वनविभागाचे कर्मचारी जंगलात मार्गावरील झाडांना अडकलेला मांजा काढत असतात. जोपर्यंत मांजा पूर्णपणे काढला जात नाही, तोपर्यंत येथे खुल्या जिप्सीमधून पर्यटनाला परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे येथील वनअधिकाऱ्यांनी सांगितले. कुण्याही पर्यटकाच्या जिवाला धोका होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याने सांगण्यात येत आहे.

...

कोट

गोरेवाडातील जंगल सफारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी कटलेल्या पतंग पडलेल्या आढळल्या. मांजा असल्याने धोका वाढला होता. खुल्या वाहनातून जाताना कुण्या पर्यटकाची मान कापली जाऊ नये, यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. लवकरच जिप्सीची सेवा सुरू केली जाईल.

- प्रमोद पंचभाई, विभागीय व्यवस्थापक, गोरेवाडा प्रकल्प, नागपूर

Web Title: Open gypsy closes in Gorewada for fear of nylon cats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.