महाविद्यालये उघडा, वर्गखोल्यांत प्रवेश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:02+5:302021-02-05T04:44:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात शाळांना सुरुवात झाली असली तरी महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्यापही शासनाने कुठलेही दिशानिर्देश जारी ...

महाविद्यालये उघडा, वर्गखोल्यांत प्रवेश द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात शाळांना सुरुवात झाली असली तरी महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्यापही शासनाने कुठलेही दिशानिर्देश जारी केलेले नाहीत. ‘कोरोना’ची स्थिती सुधारत असून लवकरात लवकर महाविद्यालये सुरू करण्यात यावीत, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मंगळवारी शहरातील विविध महाविद्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले.
मागील ११ महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. ‘ऑनलाइन’ परीक्षा झाल्या व आता वर्गदेखील ‘ऑनलाइन’ माध्यमातून भरविण्यात येत आहेत. राज्य शासनाने मद्य दुकाने, मॉल, सिनेमागृहे व शाळादेखील सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र महाविद्यालयांबाबत शासनाने मौन बाळगले आहे. महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे; शिवाय शिक्षकांनादेखील आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवायची असेल तर शासनाने राज्यातील सर्व महाविद्यालये त्वरित उघडावीत, अशी भूमिका ‘अभाविप’तर्फे मांडण्यात आली.
आर. एस. मुंडले कॉलेज, संताजी महाविद्यालय, बालपांडे फार्मसी महाविद्यालय, अवतार मेहेर बाबा महाविद्यालय, संत गाडगे बाबा महाविद्यालय, प्रेरणा कॉलेज, बिंझाणी महाविद्यालय, मोहता विज्ञान महाविद्यालय, सूर्योदय महाविद्यालय, सीपी ॲण्ड बेरार महाविद्यालय, केडीके अभियांत्रिकी महाविद्यालय, व्हीएमव्ही महाविद्यालय, श्री निकेतन महाविद्यालय, राधा कॉलेज, शासकीय विज्ञान संस्था, जीएस महाविद्यालय तसेच विद्यापीठ परिसरात निदर्शने करण्यात आली. शासनाने महाविद्यालय सुरू करण्यास अधिक विलंब केल्यास विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला. यासंदर्भात कुलगुरूंना निवेदनदेखील देण्यात आले.