टंचाईमुक्तीसाठी पाणी अडविणे हाच उपाय

By Admin | Updated: May 4, 2015 02:20 IST2015-05-04T02:20:04+5:302015-05-04T02:20:04+5:30

विदर्भात भरपूर पाऊस पडतो, पण त्याचे संवर्धन होत नसल्याने दरवर्षी टंचाईला तोंड द्यावे लागते.

The only way to stop water for irrigation | टंचाईमुक्तीसाठी पाणी अडविणे हाच उपाय

टंचाईमुक्तीसाठी पाणी अडविणे हाच उपाय

नागपूर : विदर्भात भरपूर पाऊस पडतो, पण त्याचे संवर्धन होत नसल्याने दरवर्षी टंचाईला तोंड द्यावे लागते. टंचाईपासून मुक्ती हवी असेल तर पावसाचे पाणी अडविणे, ते जमिनीत मुरविणे आणि पाण्याचा योग्य वापर करणे याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
जलयुक्त शिवार योजनेची जिल्हास्तरीय कार्यशाळा रविवारी येथील देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद््घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कार्यकारी समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार आणि ग्राम विकास खात्याचे सचिव प्रभाकर देशमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ८२ टक्के शेती कोरडवाहू आहे. राज्यातील सर्व धरणे बांधली तरी फक्त ४० टक्केच सिंचन क्षमता उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे आता पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे आणि पाण्याचा योग्य वापर करणे हाच पर्याय आहे. त्यासाठीच जलयुक्त शिवार ही योजना असून यातून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे टंचाईमुक्त करण्याचे नियोजन आहे. कुठलीही योजना फक्त सरकारच्या माध्यमातून यशस्वी होत नाही. त्यात जनसहभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे जलयुक्त शिवाराचे रूपांतर लोकचळवळीत करा आणि नागपूर जिल्हा टंचाईमुक्त करा.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक प्रभाकर देशमुख यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी मानले.
कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुधाकर कोहळे, सुधीर पारवे, अनिल सोले, विकास कुंभारे, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासह कृषी, ग्राम विकास,जलसंधारण विभागाचे अधिकारी, सरपंच, नोडल अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांचा संकल्प
चार वर्षात जिल्ह्यातील १८०० गावे टंचाईमुक्त करण्याचा आणि पुढील वर्षात जिल्ह्यात पाणी टंचाईसाठी आराखडा तयार न करण्याचा संकल्प यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. जलयुक्त शिवारची कामे करण्यासाठी ६ पोकलॅण्ड आणि १३ टिप्पर खरेदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: The only way to stop water for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.