शासकीय केंद्रांवरून १२ व १४ एप्रिलला होणार फक्त ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST2021-04-12T04:07:44+5:302021-04-12T04:07:44+5:30
आवश्यकता भासल्यास आरटीपीसीआरची व्यवस्था लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यास उशीर होत आहे. ...

शासकीय केंद्रांवरून १२ व १४ एप्रिलला होणार फक्त ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’
आवश्यकता भासल्यास आरटीपीसीआरची व्यवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यास उशीर होत आहे. हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि काही तांत्रिक अडचणीमुळे सोमवारी १२ एप्रिल आणि बुधवारी १४ एप्रिल रोजी सर्व शासकीय चाचणी केंद्रांवरून केवळ ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’ करण्यात येणार आहे. तसेच १३ एप्रिलला गुढीपाडव्यानिमित्त चाचणी केंद्रे बंद राहतील.
कोविड चाचणी केल्यानंतर तातडीने अहवाल प्राप्त झाल्यास पॉझिटिव्ह रुग्णांना पुढील उपचार घेणे सोयीचे होते. मात्र सध्या चाचण्यांची संख्या वाढल्याने परीक्षण करणाऱ्या मेडिकल, मेयो, एम्स, आरटीएमएनयू येथील प्रयोगशाळांवरील भार वाढला आहे. त्यामुळे चाचणी अहवाल प्राप्त होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे या प्रयोगशाळांकडे असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि नव्या संभाव्य रुग्णांपासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी सोमवार १२ एप्रिल व बुधवार १४ एप्रिल रोजी सर्व ४२ शासकीय चाचणी केंद्रांवरून केवळ ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’ करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन् बी. यांनी दिली.
या चाचणीचा लेखी अहवाल रुग्णांना त्याच केंद्रावरून उपलब्ध होऊ शकेल. ज्यांना लक्षणे आहेत, मात्र रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ते निगेटिव्ह आले असतील, अशा व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचणीची विशेष व्यवस्था करण्यात येईल. अँटिजेन टेस्टचे प्राप्त अहवाल त्याचवेळी आयसीएमआर पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देशही मनपा आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत.