शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘झिरो बजेट’ शेती एकमेव पर्याय
By Admin | Updated: February 13, 2016 02:38 IST2016-02-13T02:38:05+5:302016-02-13T02:38:05+5:30
शेतकरी नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. परंतु सरकार त्याच्या या आत्महत्यामागील कारणांचा शोध न घेता ....

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘झिरो बजेट’ शेती एकमेव पर्याय
रासायनिक व सेंद्रीय शेती एक षङ्यंत्र : सुभाष पाळेकर यांची लोकमतला भेट
नागपूर : शेतकरी नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. परंतु सरकार त्याच्या या आत्महत्यामागील कारणांचा शोध न घेता त्याला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करून पुन्हा आत्महत्येसाठी प्रोत्साहित करीत आहे. हे चुकीचे आहे. आज शेतकऱ्याला अनुदान किंवा आर्थिक मदतीची नव्हे तर ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीची गरज आहे. ही नैसर्गिक शेती म्हणजे, कर्जमुक्त, चिंतामुक्त, विषमुक्त, कष्टमुक्त, शोषणमुक्त, रोग-कीडमुक्त, दुष्काळमुक्त, अवकाळी संकटमुक्त व आत्महत्यामुक्त अशी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुखी व समृद्ध करणारी निसर्ग, ज्ञान व विज्ञानावर आधारित कृषी पद्घती असल्याचा विश्वास पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केला.
त्यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ भवनला सदिच्छा भेट दिली, यावेळी ते संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा करीत होते. पाळेकर पुढे म्हणाले, ‘रासायनिक व सेंद्रीय’ शेती पद्घती फार मोठे षङ्यंत्र आहे. रासायनिक खताच्या वापराने जमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत. उत्पादकता घटली असून, उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे आणि यातूनच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करू लागला आहे. वास्तविक यात स्वत:ला कृषी वैज्ञानिक म्हणून घेणारे सर्वात मोठे दोषी आहेत. या वैज्ञानिकांनी आजपर्यंत केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. ते आजपर्यंत जमिनीत काहीच नाही, असेच सांगत फिरले आहे. मात्र ते यातून शेतकऱ्यांचीच नव्हे तर संपूर्ण देशाची दिशाभूल करीत आले आहे. परंतु आपण आजपर्यंत केलेल्या संशोधनातून निसर्गातच सर्वकाही उपलब्ध असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. जमिनीच सर्वकाही आहे. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, जंगलातील फळांची झाडे आहेत. जंगलातील फळाच्या झाडाला कोणत्याही प्रकारचे रासायनिक किंवा सेंद्रीय खत दिल्या जात नाही. मात्र तरीसुद्धा त्या झाडाला भरघोस फळ लागतात. यावरून फळझाडांना कोणत्याही प्रकारचे रासायनिक किंवा सेंद्रीय खतांची गरज नसल्याचे स्पष्ट होते. मात्र त्याचवेळी कृषी वैज्ञानिकांनी स्वार्थापोटी रासायनिक व सेंद्रीय खतांच्या वापराने जमिनीतील पोषक जीवाणू नष्ट केले असल्याचा आरोपही यावेळी पाळेकर यांनी केला. त्यामुळे आज संपूर्ण देशाला ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेती पद्धतीची गरज असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात ‘झिरो बजेट’ शेती पद्घती राबविण्याचा निर्णय जाहीर केला असून, हरियाणा व हिमाचल प्रदेशसुद्धा हालचाली करीत आहे. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र सरकार एवढे सुस्त का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
काय आहे, ‘झिरो बजेट शेती’
पाळेकर यांनी अत्यंत सोप्या व सरळ भाषेत ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीची संकल्पाना सांगितली. यात ते म्हणाले, केवळ एका देशी गायीच्या बळावर शेतकरी हा ३० एकर शेती विकसित करू शकतो. देशी गायीच्या शेणात पिकाला आवश्यक सर्वाधिक जीवाणू असतात. त्यानुसार १० किलो शेणापासून २०० लिटर पाण्यात जीवामृत तयार करून त्याचा एक एकर जमिनीत उपयोग होतो. या जीवामृताच्या उपयोगातून शेतीची उत्पादकता वाढते. शिवाय ९० टक्के पाणी व विजेची बचत होते. दुसरीकडे रासायनिक व सेंद्रीय शेतीच्या तुलनेत उत्पादनात भरघोस वाढ होते. खर्च मात्र शून्य असतो. पिकांवर कीड किंवा इतर कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे सध्या रासायनिक खताच्या वापराने निकस झालेल्या जमिनीत हा प्रयोग केल्यास अवघ्या तीन महिन्यात शेतकऱ्यांची जमीन पूर्वीसारखी सुपीक होऊन, त्यात भरघोस उत्पादन घेतले जाऊ शकते.
रासायनिक शेतीपासून सर्वाधिक प्रदूषण
संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करीत आहे. परंतु त्याचवेळी रासायनिक व सेंद्रीय शेतीपासून वातावरणात सर्वाधिक प्रदूषण होत असल्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे यावेळी पाळेकर म्हणाले. वातावरणात सर्वाधिक प्रदूषण उद्योगांमुळे होते, असा सर्वसामान्य समज आहे. परंतु तो भ्रम आहे. रासायनिक शेतीमुळे ६० टक्के तर उद्योगांमुळे केवळ ४० टक्के प्रदूषण होत असल्याचे ते म्हणाले.
‘पद्मश्री’मुळे शेतकऱ्यांना बळ
‘पद्मश्री’ पुरस्काराविषयी बोलताना ते म्हणाले, एवढा मोठा पुरस्कार आपल्याला मिळेल, असा कधीही विचार केला नव्हता. कोणत्याही राजकीय पक्षात उठबस नाही. नेत्यांचा सहवास नाही. किंवा त्यासाठी अर्जसुद्धा केला नाही. असे असताना ‘पद्मश्री’साठी आपली निवड झाली, हे ऐकून आश्चर्य वाटले होते. शिवाय खऱ्या कामाचे मूल्यमापन झाले, याचे समाधानही वाटले. आतापर्यंत शेतकरी म्हणजे, बहिष्कृत आणि अडाणी असेच समजले जात होते. परंतु आता ‘पद्मश्री’ने त्या शेतकऱ्यांचे बळ वाढविले आहे, असे पाळेकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
भंडारा येथे धान उत्पादकांसाठी चार दिवसीय शिबिर
कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान भंडारा येथे धान पीक उत्पादकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पद्मश्री सुभाष पाळेकर शेतकऱ्यांना धान पिकांवर विशेष मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम बावनकुळे सभागृह, ठाणा पेट्रोलपंप (जवाहरनगर) येथे होणार आहे. विशेष म्हणजे, पाळेकर महिन्यातील ३० दिवसांपैकी साधारण २० ते २५ दिवस अशा व्याख्यानातून ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीचा प्रचार व प्रसार करीत आहेत.