- कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : आक्षेपासाठी आजची मुदत, ४,०७७ मतदार
नागपूर : हायकोर्टाच्या आदेशानंतर नागपूर जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याच्या कामात सहकार खाते गुंतले असून, कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील मतदारांची प्राथमिक यादी बाजार समिती, उपनिबंधक कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयात बोर्डवर लावण्यात आली आहे. यादीवर आक्षेप घेण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट असून, २४ ऑगस्टपर्यंत केवळ एक आक्षेप घेण्यात आला आहे.
समितीच्या निवडणूक यादीत नागपूर तालुक्यातील ४,०७७ मतदार आहेत. यामध्ये अडतिया व व्यापारी २,२४२, ग्रामपंचायत सदस्य ६४८, सेवा सहकारी संस्था ६७२, हमाल-मापारी-तोलारी ५१५ अशी मतदार संख्या आहे. मतदार यादीवर आक्षेप घेण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट आहे. त्यानंतरच उपनिबंधक कार्यालय ७ सप्टेंबरला अंतिम यादी प्रकाशित करणार आहे. विघ्न न आल्यास समितीची निवडणूक वेळापत्रकानुसार होऊन नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे.
२०१२ मध्ये झाली होती कळमना एपीएमसीची निवडणूक
कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २०१२ मध्ये झाली होती. त्यात पाच वर्षांसाठी कार्यकारिणी निवडून आली होती. कार्यकाळ संपल्यानंतर राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली होती. त्यानंतर कळमन्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत. कळमना बाजार समितीवर अनेक राजकीय पक्षांची वर्चस्वाची लढाई सुरू आहे. ही समिती भ्रष्टाचारामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. वेगवेगळ्या मुद्यांवर अनेकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यानंतरही निवडणूक होऊ शकली नाही. अखेर हायकोर्टाने ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील कळमेश्वर, काटोल, नरखेड, नागपूर, कामठी आणि हिंगणा बाजार समित्यांमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
अंतिम यादी ७ सप्टेंबरला जाहीर होणार
निवडणुकीसाठी ४,०७७ मतदारांची यादी प्रकाशित केली आहे. त्यावर मतदारांना २५ ऑगस्टपर्यंत आक्षेप घ्यायचे आहे. त्यानंतर आक्षेप निकाली काढण्यात येईल. अंतिम यादी ७ सप्टेंबरला प्रकाशित करण्यात येणार आहे.
- गौतम वालदे, उपनिबंधक, नागपूर जिल्हा सहकार विभाग