बजेटमध्ये फक्त घोषणा प्रत्यक्षात कृती नाही

By Admin | Updated: June 28, 2014 02:41 IST2014-06-28T02:41:32+5:302014-06-28T02:41:32+5:30

दरवर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प फुगवून सादर केला जातो. यात नवनवीन योजना मांडून नागपूरकरांना विकासाचे स्वप्न दाखविले जाते.

The only announcement in the budget is not actually action | बजेटमध्ये फक्त घोषणा प्रत्यक्षात कृती नाही

बजेटमध्ये फक्त घोषणा प्रत्यक्षात कृती नाही

नागपूर : दरवर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प फुगवून सादर केला जातो. यात नवनवीन योजना मांडून नागपूरकरांना विकासाचे स्वप्न दाखविले जाते. प्रत्यक्षात अर्थसंकल्प कृतीत उतरतच नाही. गेल्या काही वर्षात अर्थसंकल्पात केलेल्या १० टक्केही घोषणा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे सत्ताधारी फसवा अर्थसंकल्प कशासाठी सादर करतात, जनतेला उल्लू का बनवतात, असा सवाल राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रगती पाटील यांना पत्रकार परिषदेत केला.
१ जुलै रोजी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होत आहे. याबाबत पाटील म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांनी बीओटी तत्त्वावर अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली होती. एकही हॉस्पिटल उभारले नाही. आहे त्या दवाखान्यांकडे दुर्लक्ष केले. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल शॉप सुरू केले जाणार होते. प्रत्यक्षात झाले नाही. युवा जीवन सुरक्षा प्रकल्प, बाल आरोग्य सुधार प्रकल्प सुरूच झाले नाहीत. एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या नाल्यांची सफाई झालेली नाही. १ लाख कामगारांचे लसीकरण झाले नाही. अ‍ॅन्टी रॅबीज व्हॅक्सीनचा तुटवडा आहे. नवजात बालकांना मोफत औषधोपचार मिळत नाही. दंतचिकित्सा केंद्र सुरू करण्यासाठी नबिदाद संस्थेला कार्यादेश दिले पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. महापालिकेच्या शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी होत नाही. प्रभाग तिथे व्हॉलिबॉल मैदान उभारण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात आहे त्या मैदानांवर अतिक्रमण होत आहे. बंद पडलेल्या शाळा नामवंत संस्थाना सीबीएसई पॅटर्ननुसार चालविण्यासाठी देण्याची योजना आखली. पण ती योजना फाईलमध्येच बंद आहे.
अपंगांसाठी केलेल्या घोषणांचीही अंमलबजावणी झाली नाही. शहरात फवारणीसाठी फॉगिंग मशीन नाही.
जनावरांचे गोठे अद्याप हटविलेले नाहीत. न झेपणाऱ्या घोषणा सत्ताधारी कशासाठी करतात, असा सवाल करीत जनतेची दिशाभूल करणे थांबविण्याचा सल्ला त्यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: The only announcement in the budget is not actually action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.