२५ टक्केच विद्यार्थी शाळेत पोहचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:48+5:302021-01-16T04:11:48+5:30
नागपूर : राज्यभरात ९ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये १४ डिसेंबर तर महापालिकेच्या हद्दीतील शाळांमध्ये ...

२५ टक्केच विद्यार्थी शाळेत पोहचले
नागपूर : राज्यभरात ९ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये १४ डिसेंबर तर महापालिकेच्या हद्दीतील शाळांमध्ये ४ जानेवारीपासून शाळांना सुरुवात झाली. पण शिक्षण विभागाला अपेक्षित विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळेत दिसून आलेली नाही. नागपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या शाळा भेट अहवालाच्या नुसार २५ टक्केच विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहेत. ग्रामीणमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ३४ टक्क्यांवर पोहचली. तर शहरात अजूनही १६ टक्केच विद्यार्थी शाळेत जात आहेत.
नागपूर जिल्ह्यात ९ ते १२ वर्गाच्या १२०९ शाळा सुरू झाल्या असून, २७२८७० विद्यार्थी प्रवेशित आहेत. यात ग्रामीणमध्ये ६४६ शाळेत १३१२४२ तर महापालिकेच्या हद्दीतील ५६३ शाळांमध्ये १४१६२८ विद्यार्थ्यांची नोंद आहे. १४ डिसेंबर रोजी ग्रामीणच्या शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी जिल्ह्यात १६ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ग्रामीण भागातील शाळा सुरू होऊन महिना लोटला आहे. आजच्या घडीला शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या ४५०७९ एवढी आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढेल, अशी अपेक्षा होती. पण १० दिवसाच्या कालावधीत केवळ ८ हजार विद्यार्थी वाढले आहेत. ग्रामीण भागात गेल्या महिन्याभरात एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. शाळांना शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शाळा योग्य ती खबरदारी घेत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात अजूनही पालकांमध्ये कोरोनाची धास्ती आहे. त्यामुळे अनेक पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्यासंदर्भातील संमतीपत्र देखील दिलेले नाही. शाळा सुरू झाली असली तरी ऑनलाईन शिक्षणही सुरूच आहे. त्यामुळे शहरात विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली नाही.
प्रवासी साधनांचा फटका
ग्रामीण भागात महिन्याभरात विद्यार्थ्यांची संख्या तीन पटीने वाढली आहे. ग्रामीण भागात ऑनलाईनपेक्षा विद्यार्थी शाळेत येण्यासाठी उत्सुक आहे. पण विद्यार्थ्यांची टक्केवारी न वाढण्याला अजूनही प्रवासी साधने वाढलेली नाही. स्कूलबस बंद आहेत. ग्रामीण भागातून बसेस सुरू झालेल्या नाहीत. हेच एकमेव कारण आहे. विद्यार्थी व पालकांमध्ये कुठलीही भीती नाही, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते.
शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती
शाळा विद्यार्थी संख्या उपस्थिती
मनपा हद्दीत ५६३ १४१६२८ २२८७०
नागपूर ग्रामीण ६४६ १३१२४२ ४५०७९