औरंगाबाद, पुण्याच्या बसमध्ये केवळ १५ प्रवासीच ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:07 IST2021-03-27T04:07:14+5:302021-03-27T04:07:14+5:30
नागपूर : कोरोनामुळे प्रवासी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम पडला आहे. जिल्ह्याबाहेर जाणेही प्रवाशांनी ...

औरंगाबाद, पुण्याच्या बसमध्ये केवळ १५ प्रवासीच ()
नागपूर : कोरोनामुळे प्रवासी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम पडला आहे. जिल्ह्याबाहेर जाणेही प्रवाशांनी कमी केल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. यात पुणे आणि औरंगाबादला जाणाऱ्या बसमध्ये केवळ १५ प्रवासीच मिळत असल्याची स्थिती आहे.
मुख्यालयातून जातात ५५० फेऱ्या
नागपूर शहरात गणेशपेठ आगारातून पूर्वी ११५० फेऱ्या नियमित सोडण्यात येत होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांनी प्रवास टाळणे सुरु केल्यामुळे आता केवळ ५५० फेऱ्या सोडण्यात येत आहेत. ११५० फेऱ्या असताना २५ हजार प्रवासी प्रवास करायचे. परंतु फेऱ्या कमी करण्यात आल्यामुळे प्रवाशांची संख्या केवळ १२ हजारावर आली आहे.
पुणे, औरंगाबादच्या बसमध्ये प्रवासी कमी
कोरोनाच्या पूर्वी पुण्यासाठी ६ बसेस सोडण्यात येत होत्या. परंतु प्रवाशांची संख्या घटल्यामुळे एसटी महामंडळाने पुण्याला जाणाऱ्या ४ बसेस बंद केल्या. सध्या दोनच बसेस पुण्याला जातात. औरंगाबादलाही जाणाऱ्या ६ बसेसपैकी ४ बसेस बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळे पुणे आणि औरंगाबादच्या बसेसमध्ये केवळ १४ ते १५ प्रवासीच मिळत आहेत.
या मार्गावर आहे गर्दी
नागपूरवरून सद्यस्थितीत मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसेसमध्ये गर्दी आहे. परंतु मध्य प्रदेश शासनाने सीमा बंद केल्यामुळे मध्य प्रदेशात जाणारे प्रवासी देवरी, गोंदियापर्यंत जात असून एका बसमध्ये २२ प्रवासी मिळत आहेत तर नागपूरवरून अमरावतीला जाणाऱ्या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. परंतु पुणे, औरंगाबाद, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड या मार्गावर प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असून एका बसमध्ये केवळ १५ प्रवासीच मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नाईट आऊट बसेसला प्रतिसाद नाही
रात्री मुक्कामी जाणाऱ्या (नाईट आऊट) बसेस पूर्वी २३ सोडण्यात येत होत्या. अंबेजोगाई, पुसद, वाशिम, नांदेड, पंढरपूर, सोलापूर, अकोला, राजनांदगाव, शिवनी, मोहगाव, लोधीखेडा आणि विविध जिल्ह्याच्या ठिकाणी या बसेस जात होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटल्यामुळे आता केवळ १३ बसेस सोडण्यात येत आहेत. या १३ बसेसमध्येही प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असून एका बसमध्ये १५ ते १६ प्रवासीच मिळत असल्याची स्थिती आहे.
जिल्ह्याबाहेर जाणारे प्रवासी झाले कमी
कोरोनाच्या पूर्वी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या २० हजाराच्या आसपास होती. परंतु कोरोनामुळे प्रवासी जिल्ह्याबाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या १० हजारावर आली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढेपर्यंत फेऱ्यांची संख्या न वाढविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
गरजेनुसार बसेस सोडण्यात येतात
‘कोरोनामुळे एसटी बसेसमधील प्रवाशांची संख्या कमी झाली असून गरजेनुसार बसेस सोडण्यात येत आहेत. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पूर्ववत बसेस सुरु करण्यात येतील.’
-अनिल आमनेरकर, आगारप्रमुख, गणेशपेठ आगार
...................