वर्षभरात मनपाच्या दवाखान्यांत केवळ १,२५७ रुग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:07 IST2021-05-13T04:07:50+5:302021-05-13T04:07:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील वर्षी नागपुरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला व यासंदर्भात मनपाकडून मोठमोठे दावे करण्यात आले. ...

वर्षभरात मनपाच्या दवाखान्यांत केवळ १,२५७ रुग्ण दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील वर्षी नागपुरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला व यासंदर्भात मनपाकडून मोठमोठे दावे करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मनपाच्या कोविड केअर सेंटर्स व दवाखान्यांकडे रुग्णांनी पाठच फिरविल्याचे चित्र होते. मार्च २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत साडेचार लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना झाला व हजारो लोक विविध दवाखान्यांत दाखल झाले. मात्र १३ महिन्यांच्या कालावधीत मनपाच्या दवाखान्यांत केवळ एक हजार २५७ रुग्णच दाखल झाले. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. १ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत मनपाच्या दवाखान्यांतील ओपीडीत किती कोरोना रुग्ण आले, किती जण भरती झाले, किती मुलांचा मृत्यू झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार या कालावधीत शहरात तीन लाख २१ हजार ७३२ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली व त्यातील दोन लाख ९० हजार ६०२ रुग्ण बरे झाले. या कालावधीत तीन हजार २७५ पुरुष व एक हजार ५५५ महिलांचा मृत्यू झाला. मात्र मुलांचा मृत्यू झाला की नाही याची कुठलीही माहिती मनपाकडे उपलब्ध नाही. मनपाच्या दवाखान्यांतील ओपीडीमध्ये कोरोनाचे किती रुग्ण आले याची माहितीदेखील मनपाकडे नाही ही आश्चर्याची बाब आहे.
एसडीआरएफअंतर्गत केवळ पावणेदहा कोटींचा निधी
महाराष्ट्र शासनाच्या एसडीआरएफअंतर्गत नागपूर मनपाला १३ महिन्यांच्या कालावधीत केवळ नऊ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. तो संपूर्ण निधी खर्च झाला. राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरात अनेक वैद्यकीय सुविधांची कमतरता असताना १३ महिन्यांत इतका कमी कसा काय देण्यात आला हा प्रश्न उपस्थित होत आहे.