कुही तालुक्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवीत असल्याचे तिन्ही पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. भाजपाला मात द्यायची असेल तर एकत्र येणे गरजेचे आहे. तेव्हा गावागावात राजकारण न करता एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशा सूचना वरिष्ठ नेत्यांकडून मिळाल्याने ही निवडणूक एकत्र लढवीत आहोत, असे तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे. कुही तालुक्यात काँग्रेसचे आमदार राजू पारवे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरीश कढव, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उपासराव भुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. सुरेश कुकडे हे उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करीत आहेत.
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
तीन दिवसाच्या सुटीनंतर अर्ज दाखल करण्याचा आज तिसरा दिवस होता. त्यामुळे इच्छुकांनी एकच गर्दी केल्याने तहसील कार्यालय व प्रांगणात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा फज्जा उडाला. येथे विना मास्क नागरिकांचा वावर दिसून आला.