पहिल्या दिवशी शाळांमध्ये १० टक्केच विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST2021-02-09T04:09:34+5:302021-02-09T04:09:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या कोरोना संरक्षणात्मक सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत ११ ...

Only 10 percent students in schools on the first day | पहिल्या दिवशी शाळांमध्ये १० टक्केच विद्यार्थी

पहिल्या दिवशी शाळांमध्ये १० टक्केच विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या कोरोना संरक्षणात्मक सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत ११ महिन्यांनी सोमवारी नागपूर शहरातील शाळांतील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले; परंतु अद्यापही ‘कोरोना’वर पूर्णत: नियंत्रण आले नसल्याने पहिल्या दिवशी शाळांमध्ये उपस्थितीचे प्रमाण कमी होते व उपस्थितीची टक्केवारी सुमारे १० टक्के इतकी होती.

जिल्ह्यात ९ वी ते १२ वीचे ऑफलाइन वर्ग १४ डिसेंबर रोजी सुरू झाले. महापालिका आयुक्तांनी मनपा हद्दीतील शाळाही ४ जानेवारीपासून सुरू केल्या. ५ वी ते ८ वी वर्गांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी मनपा क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार शाळांनी तयारी सुरू केली. वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्यात आला. काही शाळांत रांगोळ्या काढून तर काही ठिकाणी ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोनाची धास्ती काही प्रमाणात अजूनही असल्याने बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती होती.

पहिल्या दिवशी २ लाख २७ हजार ३०५ पैकी २२ हजार २०८ विद्यार्थी उपस्थित होते. मनपा शाळांतील ६ हजार ८२० पैकी २ हजार ३२९ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. यात मनपाच्या ८९ शाळांसह इतर ९९२ शाळांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या तपासणीवर भर

शाळा स्वच्छता, निर्जंतुकीकरण, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटरने विद्यार्थ्यांची तपासणी इत्यादींवर भर देण्यात आला. मैदानांमध्ये जास्त अंतरावर चौकटी आखून विद्यार्थ्यांना उभे करणे असे अनेकविध उपाय शाळांनी केले होते. शिक्षक व कर्मचाऱ्यांना यासंदर्भात अनेक ठिकाणी विशेष प्रशिक्षणदेखील देण्यात आले. शिवाय वर्गखोल्या व स्टाफरूममध्येदेखील बैठक व्यवस्थेत ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात आले. दरम्यान, कोरोनामुळे सध्या शाळेचा कालावधी कमी राहणार आहे. मनपाच्या शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी दिली.

सत्राचे उरले दोनच महिने

‘कोरोना’मुळे यंदाच्या शैक्षणिक सत्राचे वर्ग ‘ऑनलाइन’ पद्धतीनेच झाले. बहुतांश विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. सत्र संपायला अवघे दोन महिने उरले आहेत. आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांत परीक्षा होतील का, असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.

Web Title: Only 10 percent students in schools on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.