पारडसिंग्यातील शेतकऱ्यांकडून हवामानाचा ‘आॅनलाईन’ अंदाज
By Admin | Updated: July 17, 2015 03:22 IST2015-07-17T03:22:36+5:302015-07-17T03:22:36+5:30
तंत्रज्ञानाच्या युगात मध्य भारतातील शेतकरीदेखील कुठेही मागे नाहीत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर तालुका येथील ...

पारडसिंग्यातील शेतकऱ्यांकडून हवामानाचा ‘आॅनलाईन’ अंदाज
नागपूर : तंत्रज्ञानाच्या युगात मध्य भारतातील शेतकरीदेखील कुठेही मागे नाहीत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर तालुका येथील पारडसिंगा गावातील शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी ‘आॅनलाईन’ प्रणालीचा वापर सुरू केला आहे. ‘लोकमत’ने पारडसिंगा गावाला बुधवारी भेट देऊन शेतकऱ्यांकडून याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.अॅक्युवेदर.कॉम’चे अधिकारीदेखील होते.
मूळची पारडसिंगा येथील असलेली नागपुरातील चित्रकार श्वेता भट्टड हिने याबाबतीत पुढाकार घेतला आहे. आपल्या गावातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज ‘आॅनलाईन’ मिळावा असा विचार तिच्या मनात चार महिन्यांअगोदर आला. ती गावातच ‘ग्राम आर्ट’ नावाचा प्रकल्प चालवते. शेतकऱ्यांनी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.अॅक्युवेदर.कॉम’ वापरावे यासाठी तेथील प्रगतिशील शेतकरी अमिताभ पावडे यांच्याकडून तिला प्रोत्साहन मिळाले.
श्वेताचे भाऊ अॅड.साकेत भट्टड हे तिच्या मदतीसाठी समोर आले व प्रकल्पाची सुरुवात केली. आम्ही आदर्श ढोरे, वेदनाथ लोही, नवकेश टेकाडे, पार्थ सूर्यवंशी आणि गणेश ढोके या स्थानिक तरुणांना यासाठी प्रशिक्षण दिले व ‘आॅनलाईन’ हवामाचा अंदाज व्यक्त करणारे ‘अॅप’ तसेच ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.अॅक्युवेदर.कॉम’ या संकेतस्थळाची सखोल माहिती दिली. या तरुणांनी या बाबी फार कमी वेळेत आत्मसात केल्या व दररोज ते गावाच्या मध्यभागी स्थानिक हवामानाचा अंदाज सांगणारा सूचना फलकच लावायला लागले. दररोज अशाप्रकारे हवामानाची माहिती देण्यात येते.
यानंतर अॅड.भट्टड यांना एक आश्चर्याचा धक्काच मिळाला. मी याबाबतीतील सखोल माहिती ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.अॅक्युवेदर.कॉम’ला पाठवली होती. एका गावातील शेतकरी संकेतस्थळाचा उपयोग करत असल्याचे कळताच ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.अॅक्युवेदर.कॉम’ चे ‘ग्लोबल स्ट्रॅटेजिक डायरेक्टर’ डॉन हिटॉन यांनी येथे भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. हिटॉन यांच्यासमवेत राष्ट्रीय व्यवस्थापक अभिमन्यू चक्रबर्ती हेदेखील होते. यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.(प्रतिनिधी)