लॉकडाऊनमध्ये हायकोर्टात ऑनलाईन कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:37+5:302021-03-13T04:14:37+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये लॉकडाऊन काळात ऑनलाईन कामकाज केले जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी नोटीस जारी करण्यात ...

लॉकडाऊनमध्ये हायकोर्टात ऑनलाईन कामकाज
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये लॉकडाऊन काळात ऑनलाईन कामकाज केले जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी नोटीस जारी करण्यात आली. पाच दिवसाच्या ऑनलाईन कामकाजात केवळ अत्यावश्यक प्रकरणे ऐकली जातील.
सदर नोटीसद्वारे ऑनलाईन कामकाजाचा कार्यक्रम ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार, १५, १७ व १९ मार्च रोजी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांचे न्यायपीठ दिवाणी रिट याचिका व सर्व जनहित याचिका, न्या. रोहित देव अटकपूर्व जामीन अर्ज, फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज, न्या. विनय जोशी नियमित जामीन अर्ज, २०११ पर्यंतच्या फौजदारी अपील्स, फौजदारी रिव्हिजन अर्ज, १६ व १८ मार्च रोजी न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांचे न्यायपीठ फौजदारी अपील्स, फौजदारी रिट याचिका, १६ मार्च रोजी न्या. विनय देशपांडे दिवाणी रिट याचिका व दिवाणी रिव्हिजन अर्ज, न्या. स्वप्ना जोशी द्वितीय अपील्स, किळकोळ दिवाणी अर्ज व नियमित जामीन अर्ज, न्या. श्रीराम मोडक प्रथम अपील्स, अपील्स अगेन्स्ट ऑर्डर व अटकपूर्व जामीन अर्ज, १७ मार्च रोजी न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांचे न्यायपीठ सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क अर्ज, संदर्भ व अपील्स, लेटर्स पेटेन्ट अपील्स, प्रथम अपील्स, कुटुंब न्यायालय अपील्स, अवमानना अपील्स व अवमानना याचिका तर, १८ मार्च रोजी न्या. विनय देशपांडे दिवाणी रिट याचिका, दिवाणी रिव्हिजन अर्ज व अटकपूर्व जामीन अर्ज आणि न्या. नितीन सूर्यवंशी २०१२ व त्यापुढील वर्षांतील फौजदारी अपील्स, सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतचे अर्ज व नियमित जामीन अर्जांचे कामकाज पाहतील. ही व्यवस्था सध्या केवळ पाच दिवसांकरिता आहे. पुढील निर्देश त्यानंतर दिले जाणार आहेत.
--------------------
त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था
ऑनलाईन सुनावणीत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नसलेले वकील व पक्षकारांसाठी उच्च न्यायालयात वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. त्यासंदर्भात कॉज लिस्ट (प्रकरणांची यादी)मध्ये माहिती दिली जाणार आहे.
-----------------
कामकाजाची वेळ १०.३० ते १
उच्च न्यायालयाच्या ऑनलाईन कामकाजाची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १ तर, कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी १० ते दुपारी २ अशी राहणार आहे. त्यानंतर न्यायालय परिसराच्या निर्जंतुकीकरणाचे काम केले जाणार आहे.