आॅनलाईन चालतोय देह व्यवसाय

By Admin | Updated: August 18, 2016 02:11 IST2016-08-18T02:11:18+5:302016-08-18T02:11:18+5:30

उपराजधानीत पसरलेला देह व्यवसायाचा कारभार ‘आॅनलाईन’ झाला आहे. स्थानिक आणि बाहेरच्या दलालांच्या माध्यमातून सुरू असलेले

Online Ongoing Body Business | आॅनलाईन चालतोय देह व्यवसाय

आॅनलाईन चालतोय देह व्यवसाय

बाहेरच्या तरुणींचा वापर : आॅनलाईन डिलिव्हरी
जगदीश जोशी नागपूर
उपराजधानीत पसरलेला देह व्यवसायाचा कारभार ‘आॅनलाईन’ झाला आहे. स्थानिक आणि बाहेरच्या दलालांच्या माध्यमातून सुरू असलेले आॅनलाईन रॅकेटच ग्राहकांची मुख्य मागणी आहे. पूर्वी देहव्यापार खासगी संपर्क आणि मोबाईलच्या माध्यमातून केला जात होता. तरुणी आणि जागा उपलब्ध करून देणे दलालाचे काम होते. अपवादात्मक ग्राहक स्वत:च ही जबाबदारी घेत होते. परंतु मागील काही महिन्यांपासून आॅनलाईन ‘डिलिव्हरी’चे काम सुरू झाले आहे.
नागपूर एस्कॉर्टच्या नावाने ५० पेक्षा अधिक दलाल सक्रिय आहेत. त्यांनी ‘डमी’ नावाने आयडी तयार केला आहे. त्यावर मोबाईल क्रमांकही टाकला आहे. ग्राहकांनी संपर्क साधल्यास त्याला वर्ड शॉपवर तरुणींची छायाचित्रे पाठविली जातात. फोटोची निवड झाल्यावर किंमत सांगितली जाते. दलाल बाहेरच्या तरुणींना एक-दोन आठवड्यांच्या करारावर येथे आणतात. हा करार ५० हजार ते १ लाख रुपयापर्यंतचा असतो. याशिवाय १९ ते २५ हजार रुपये दररोज या प्रमाणे सुद्धा मुली नागपुरात आणल्या जातात. एका तरुणीला दर दिवशी ६ ते ७ ग्राहकांना सेवा द्यावी लागते. दिवसा ग्राहक उपलब्ध न झाल्यास ‘नाईट शिफ्ट’ सुद्धा करावी लागते. याशिवाय कमाईत बरोबरीचा वाटा देण्याच्या अटीवर सुद्धा मुलींना नागपुरात आणले जाते. मुलींच्या येण्याजाण्याचा व राहण्याची संपूर्ण व्यवस्था दलाल स्वत:च करतो.
बहुतांश आॅनलाईन टोळी तरुणींची ‘डिलिव्हरी‘’ आॅनलाईन करण्यालाच प्राधान्य देतात. यात जागेची व्यवस्था ग्राहकालाच करावी लागते. किंमत ठरल्यानंतर दलाल तरुणीला संबंधित जागेवर सोडून देतो. ग्राहक तरुणीलाच ठरलेली रक्कम अदा करतो. अनैतिक व्यापार विरोधी कायदा (पीटा) अंतर्गत देह व्यापारासाठी वापरण्यात आलेल्या तरुणीला किंवा महिलेला पीडित मानले जाते. देहव्यापारासाठी वापर करणारा दलाल हा मुख्य आरोपी मानला जातो. पैसे घेऊन सापडल्याचा धोका लक्षात घेता दलाल आता ग्राहकांकडून थेट पैसे घेत नसल्याचे दिसून येत आहे. तरुणीचा करार संपताच दलालाशी लेनदेन पूर्ण करून ती परत जाते. ही काळजी दोघेही घेतात. याबाबतची काळजी न घेतल्यानेच निशा ऊर्फ पूजा दहीकरच्या धर्तीवर दलाल पोलिसांच्या हाती लागतात.
स्थानिक दलाल हे मुंबई, दिल्ली, चंदीगड, हैद्राबाद, इंदूर, कोलकाता येथील दलालाशी जुळलेले असतात. त्यांच्या माध्यमातूनच मुलींना येथे बोलाविले जाते. पोलिसांच्या हाती बहुतांश स्थानिक दलालच लागतात. ते सापडताच बाहेरचे दलाल आपली जागा आणि मोबाईल क्रमांक बदलून घेतात. त्यामुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. दुसरीकडे पीडित तरुणी काही दिवसानंतर आश्रय स्थळातून मुक्त केली जाते.
ती मुक्त होताच देह व्यापार पुन्हा सुरू होतो. गेल्या काही वर्षात नागपूर हे देह व्यापारात गतीने विकसित झाले आहे. त्यामुळे येथे बाहेरच्या तरुणींची नेहमीच वर्दळ असते. येथे नेहमीच १५ ते २० बाहेरच्या मुली असतात. त्या व्यावसायिक असतात. एका ठिकाणी १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस थांबत नाही. देशभरातील दलालांचा नेटवर्क वापरत असल्याने त्यांना वर्षभर काम मिळत असते. व्यावसायिक पद्धतीने हे काम करणाऱ्या तरुणींचा हा व्यवसाय पाच ते सात वर्षांपर्यंत असतो.
त्यामुळे या कालावधीत सर्वकाही मिळवून घेण्याचा त्यांचा प्लॅन असल्याने कुठलाही करार हातातून जाऊ देत नाही.

स्थानिक तरुणींना ग्राहकांचा नकार
मागील काही दिवसांपासून नियमित ग्राहकांनी स्थानिक तरुणींना पसंद करणे बंद केले आहे. स्थानिक तरुणींद्वारे अनेक ग्राहकांना ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचे प्रकार घडले. त्यामुळे बदनामीची भीतीसुद्धा असते. त्यामुळे नियमित ग्राहकांसोबतच दलालांनीसुद्धा बाहेरच्या तरुणींनाच प्राधान्य देणे सुरूकेले आहे.

 

Web Title: Online Ongoing Body Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.