कलाक्षेत्रासाठी ‘ऑनलाईन’ ही एक नवी विधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST2020-11-28T04:10:57+5:302020-11-28T04:10:57+5:30

कलाक्षेत्रासाठी ‘ऑनलाईन’ ही एक नवी विधा! कोणत्याच काळात अभिव्यक्ती कधीच थांबली नाही. अगदी कोरोनाच्या काळातही नाही. कोरोनात काळ थबकला ...

Online is a new genre for the arts! | कलाक्षेत्रासाठी ‘ऑनलाईन’ ही एक नवी विधा!

कलाक्षेत्रासाठी ‘ऑनलाईन’ ही एक नवी विधा!

कलाक्षेत्रासाठी ‘ऑनलाईन’ ही एक नवी विधा!

कोणत्याच काळात अभिव्यक्ती कधीच थांबली नाही. अगदी कोरोनाच्या काळातही नाही. कोरोनात काळ थबकला आहे थांबला नाही, हे जाणवतेसुद्धा. संक्रमणाच्या भीतीने भेटू शकत नाही, उपक्रम राबवू शकत नाही आणि अभिव्यक्तीला प्रत्यक्ष मांडता येत नाही, हे खरे असले तरी संवाद थांबलेला नाही. संवादाच्या तऱ्हा तंत्रज्ञानाने बदलल्या असल्याने ग्लोबल व्हिलेजच्या धर्तीवर ऑनलाईन स्वरूपात प्रत्येकच जण एकमेकांच्या जवळ होता. नाटकांच्या तालमी आभासी माध्यमातून शक्य नसल्या तरी तात्पुरत्या काळात का होईना, तेही शक्य करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, नाटकांसाठी हेच भविष्य आहे का, असा भाबडा प्रश्न अनेकांच्या मेंदूत उपस्थित झाला आहे. मात्र, ऑनलाईन ही यंत्रणा अभिव्यक्तीसाठी एक उत्तम माध्यम आहे, पर्याय नव्हे... अशी माझी ठाम धारणा आहे.

माध्यमांतर करत राहणे आणि परिवर्तन स्वीकारणे, ही सुज्ञांची लक्षणे आहेत. तुमच्या आविष्कारासाठी आणि रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे गरजेचे आहे. तोच सुज्ञपणा कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीच्या काळात रंगकर्मींनी दाखवला. हेतू एकच होता आणि तो म्हणजे सतत मार्गक्रमण हाेत राहावे. टाळेबंदीत ऑनलाईनचा सर्वात मोठा लाभ झाला तो म्हणजे संकुचित असलेल्या नाट्यक्षेत्राची पोहोच सर्वदूर वाढली. सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या हौशी रंगकर्मीला अशक्य अशा महागड्या व मोठ्या संस्थांच्या व मोठ्या रंगकर्मींच्या नाट्यकार्यशाळांमध्ये सहज आणि नि:शुल्क घरबसल्या सहभागी होता आले. एरवी दिल्ली, मुंबई, कोलकाता येथे होणाऱ्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची इच्छा कायम स्वप्नवतच असे. कार्यशाळांसाठी शुल्क भरणे, तेथेपर्यंत प्रवास करणे आणि जेवढे दिवस ती कार्यशाळा तेवढे दिवस राहणे व जेवणाची व्यवस्था करणे ही बाब सर्वसामान्य रंगकर्मीच्या ताब्यातील गोष्ट नव्हती. ती गोष्ट या काळात साधता आली. शिवाय, हौशी नाट्यसंस्थांना ऑनलाईन, ओटीटी प्लॅटफॉर्मचे तंत्र कळले. रंगकर्मींचा संपर्क सातासमुद्रापार पोहोचला. एकप्रकारे कलाक्षेत्रातील एक नवीन विधा म्हणून या माध्यमाकडे आता बघता येऊ शकते. ही विधा चित्रपट, मालिका यांच्यापेक्षा अगदी भिन्न आहे आणि भविष्यात यात मोठे काम होण्याची अपेक्षाही आहे. या माध्यमातून आजवर जो युवावर्ग नाट्यक्षेत्रापर्यंत पोहोचला नव्हता, त्याच्यापर्यंत नाट्यक्षेत्र पोहोचण्यास बळ मिळाले आहे. तालिम, वाचन आणि अंशत: कार्यशाळा या माध्यमातून नाट्यक्षेत्राचे भविष्य उत्तम करता येण्यासही वाव आहे.

मात्र, तुर्तास टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर आणि सांस्कृतिक क्षेत्र अनलॉक झाल्यानंतर आता मात्र आपल्या मूळ शैलीकडे वळणे गरजेचे झाले आहे. नाटक ही एक लाईव्ह कलाकृती आहे. प्रत्यक्ष सादरीकरण व बघण्यातच करणाऱ्याला आणि बघणाऱ्याला आत्मानंद देणारी ही कलाकृती आहे. त्याचा अनुभवही अनेकांच्या संवादातून घेता आला. कलावंत आता बाहेर पडला आहे. त्यांच्या कलाकृतीही सज्ज होत आहेत. मात्र, त्यांच्या कलाकृतीला रसिकांशिवाय किंमत नाही. या कलाकृती जगण्यासाठी आणि ऑनलाईन वापर विकासासाठी करण्यासाठी रसिकांची उपस्थिती महत्त्वाची आहे. त्यामुळे, ऑनलाईन ही यंत्रणा तुम्हाला प्रोग्रेस करण्यासाठी, सर्वदूर पोहोचण्यासाठी उत्तम माध्यम आहे. मात्र, पर्याय म्हणून विचार करत असाल तर वेळीच चिंतन करण्याची गरज आहे, हे लक्षात घ्यावे.

रूपेश पवार, युवा नाटककार, नागपूर

Web Title: Online is a new genre for the arts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.