ऑनलाईन सभेत होणार महापौर, उपमहापौरांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST2021-01-02T04:07:53+5:302021-01-02T04:07:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नववर्षात मनपाला नवे महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. ५ जानेवारी २०२१ रोजी ही निवडणूक ...

ऑनलाईन सभेत होणार महापौर, उपमहापौरांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नववर्षात मनपाला नवे महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. ५ जानेवारी २०२१ रोजी ही निवडणूक होत आहे. आधी कविवर्य सुरेश भट सभागृहात महासभा घेण्यात येणार होती. परंतु राज्य शासनाच्या सूचनेनुसार ही सभा ऑनलाईन घेतली जाणार आहे. परंतु यामुळे नगरसेवकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
महापौरपदाची निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार, महापौर व उपमहापौर या पदाकरिता ज्या सदस्यांनी नामनिर्देशन अर्ज सादर केले आहे, त्यांनीच महपालिकेच्या पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृह येथे उपस्थित राहाणे आवश्यक आहे. बैठकीच्या बाबतीत ४५ मिनिटापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग लिंक महापालिका सदस्य तसेच अधिकारी यांना पाठविण्यात येईल.
सदस्यांनी सभेच्या किमान २० मिनिटापूर्वी ऑनलाईन उपस्थिती दर्शविणे बंधनकारक आहे. सभा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत सर्वांनी लिंकवर उपस्थित राहावे. सभा सुरू असताना कुणी अधिकारी बाहेर त्याआधी गेल्यास विषयाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. बोलत नसताना प्रत्येकाने वेबएक्सचा आवाज बंद ठेवावा. हेडफोनचा वापर करावा, मोबाईल अथवा लॅपटॉप योग्यरीत्या कार्यरत आहे याचीही खात्री करावी. प्रत्येकाने ऑनलाईन वेळेत उपस्थित राहावे, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.