- मुले गुंतली पारंपरिक व्यवसायात : हजारो मुलांचे भवितव्य कोरोनाच्या विळख्यात
- कोरोना संक्रमणाने शिक्षण व्यवस्थेचे पितळ पडले उघडे
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यातील शिक्षणाचे कार्यान्वयन ऑनलाईन होत असले तरी आत्ता आत्ताच शिक्षणाचा झरा फुटलेल्या गावकुसाबाहेरील पारधी बेड्यांवर 'ऑनलाईन एज्युकेशन' पोहोचलेले नाही, ही शोकांतिका आहे.
फासे पारधी समाज आता स्वत:ला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मजुरी आणि शेतीही करायला लागला आहे. सोबतच मुलांना शिक्षणाच्या गंगेत न्हाऊ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून या समाजातील मुलांचे शिक्षण अंधारात गेले आहे. शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था शाळांतर्फे करण्यात आली. मात्र, या समाजातील मुलांपर्यंत हे 'ऑनलाइन एज्युकेशन' पोहोचलेले नाही.
नागपुरात हिंगणा, शेषनगर, येरणगाव, दाभा तांडा, भानसोली, आसोला सावंगी, बोरखेडी, इसासनी, भिमनगर, किनीरिठी, गोंडखैरी, वाजमोरी, मांडवी, डोंगरगाव, उबरमठ, ठाणगाव, उमठा असे ५२ पारधी बेडे आहेत. आपल्याच आयुष्यात मस्त असलेल्या या समाजातील मुलांना शिक्षणाची ओढ लागावी म्हणून त्यांच्यासाठी शाळांमध्ये विशेष सवलत प्रदान करण्यात आली आहे. मुले शाळेत यायलाही लागली आणि पालकांनीही उशिराने का होईना, शिक्षणास पाठिंबा देण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्या वर्षी देशभरात झालेला कोरोनाचा शिरकाव आणि त्यायोगे लागू झालेली टाळेबंदीने मुलांचे व पालकांचे मन बदलल्याचे दिसून येते. टाळेबंदीमुळे हा समाज पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक व्यवसायात अर्थात दारू काढण्याच्या व शिकारीच्या व्यवसायाकडे वळू लागला आहे. शाळा बंद असल्याने आणि मोबाइलबाबत तेवढीशी जिज्ञासा नसल्याने पालक मुलांना पारंपारिक व्यवसायातच जुंपत आहेत. अशा तऱ्हेने या बेड्यांवरील हजारो मुले शिक्षणापासून परावृत्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.
-----------------
नागपुरातील हजार मुले शिक्षणापासून परावृत्त
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३२, तर शहरी भागाच्या वेशीवर २० पारधी वसाहती आहेत. यात एकूण हजार-बाराशे विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. मोबाइलचे काम केवळ मनोरंजनासाठी असते, हेच ठावूक असलेल्या या समाजातील मुलांना ऑनलाइन शिक्षणाबाबत तेवढीशी जागृती नाही. शिवाय, अनेकांजवळ मोबाइलही नाही. त्यामुळे, ही मुले वर्षभरापासून शिक्षणापासून वंचित झाली आहेत.
------------------
१२ मुलांचे शैक्षणिक भविष्य काय
२०२० मध्ये हिंगणा तालुक्यातील शेषनगर येथील १२ विद्यार्थी एकसाथ दहावी उत्तीर्ण झाले. त्यानंतर लागलीच टाळेबंदी लागू झाली आणि शिक्षण ऑनलाइन झाले. दहावी उत्तीर्ण झाल्यामुळे समाजात आनंद होता. मात्र, या आनंदाला पुढचा मार्ग मिळालेला नाही. ही मुले आता शिकारीला लागली आहेत आणि इतर शालेय शिक्षण घेणाऱ्या दीडशे मुलांचे शैक्षणिक भविष्य अधांतरी आहे.
- बबन गोरामन, अध्यक्ष : विदर्भ आदिवासी पारधी विकास परिषद
------------------
* विदर्भात पारधी बेड्यावरची लोकसंख्या-अडीच लाख
* पारधी बेडे असलेले प्रमुख जिल्हे
अमरावती - ४८ बेडे
नागपूर - ५२ बेडे
यवतमाळ - ५८ बेडे
वाशिम - ४० बेडे
अकोला - ३८ बेडे
.....................