नऊ महिन्यात तब्बल ३.२२ लाख वाहनचालकांवर ऑनलाईन कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST2021-09-26T04:08:50+5:302021-09-26T04:08:50+5:30
दयानंद पाईकराव नागपूर : वाहन चालविताना अनेक वाहनचालक सिग्नल तोडतात, हेल्मेट घालत नाहीत, रॉंग साईड वाहन चालवितात. काही जण ...

नऊ महिन्यात तब्बल ३.२२ लाख वाहनचालकांवर ऑनलाईन कारवाई
दयानंद पाईकराव
नागपूर : वाहन चालविताना अनेक वाहनचालक सिग्नल तोडतात, हेल्मेट घालत नाहीत, रॉंग साईड वाहन चालवितात. काही जण तर नो पार्किंगमध्ये वाहन उभे करून वाहतूक नियमाचा भंग करतात. अशा वाहनचालकांची नोंद चौकातील वाहतूक पोलीस घेतो किंवा प्रत्येक चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद होते. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाईन दंड ठोठावला जातो. परंतु महाट्राफिक ॲपवर जाऊन हवी ती माहिती भरल्यास तुमच्या वाहनावर किती दंड आहे हे लगेच माहीत पडते. परंतु माहितीच नसल्यामुळे वाहनचालक बेफिकीर राहतात. होय, नागपूर शहरात १ जानेवारी ते २५ सप्टेंबर दरम्यान ३ लाख २२ हजार ६२८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडे दंडाची ७ कोटी ७८ लाख १३ हजार २०० रक्कम थकीत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
-७ कोटी ७८ लाख १३ हजार २०० दंड येणे बाकी
नागपूर शहरात १ जानेवारी ते २५ सप्टेंबर दरम्यान एकूण ३ लाख २२ हजार ६२८ वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम तोडले. त्यांच्यावर ऑनलाईन दंड ठोठावण्यात आला. दंडापोटी वाहतूक विभागाला ७ कोटी ७८ लाख १३ हजार २०० रुपये दंड येणे बाकी आहे. ऑनलाईन दंड टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. परंतु चौकात वाहतूक पोलीस नसला की अनेकजण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. अशा वाहनचालकांची नोंद चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात होऊन त्यांच्या वाहनांना ऑनलाईन दंड आकारण्यात येतो.
अशी आहे आकडेवारी
१ जानेवारी ते २५ सप्टेंबर २०२१
गुन्ह्याचा प्रकार कारवाई दंड
रॉंग साईड १४३६६७ २९३७०००
हेल्मेट नाही १३०२८० ६५१४००००
नो पार्किंग ३८६०८ ७७२१६००
सिग्नल तोडणे १००७३ २०१४६००
महाट्रॅफिक ॲपवर शोधा दंड
-आपल्या वाहनावर किती दंड आहे याची माहिती घरबसल्या महाट्रॅफिक ॲपवर मिळते. त्यासाठी महाट्रॅफिक ॲप उघडल्यानंतर त्यात माय चालान या ऑप्शनवर गेल्यानंतर वाहनाचा नंबर आणि इंजिन किंवा चेसीसचे शेवटचे चार नंबर टाकले की लगेच तुमच्या वाहनावर किती दंड आहे, हे कळते. त्यामुळे वाहनचालकांनी वेळोवेळी या ॲपवर जाऊन आपल्या वाहनावर दंड आहे काय, याची खात्री करावी, असा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
वाहतुकीचे नियम पाळून दंडात्मक कारवाई टाळा
‘वाहन चालविताना अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. अशा वाहनचालकांना ऑनलाईन दंड ठोठावण्यात येतो. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे.’
-सारंग आव्हाड, वाहतूक पोलीस उपायुक्त, नागपूर शहर
.........