उमेदवारांसाठी एक खिडकी योजना
By Admin | Updated: September 14, 2014 01:10 IST2014-09-14T01:10:42+5:302014-09-14T01:10:42+5:30
राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी विनाविलंब परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच संबंधित मतदारसंघात एक खिडकी सुरू करण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी एक खिडकी योजना
हेल्पलाईन सोमवारी : खर्चमर्यादा २८ लाख
नागपूर : राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी विनाविलंब परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच संबंधित मतदारसंघात एक खिडकी सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी शनिवारी तसे स्पष्ट केले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराला प्रत्यक्षात प्रचारासाठी कमी दिवस मिळत आहेत. उमेदवार एकदा प्रचारात लागले की त्यांना आहे तेवढा वेळ अपुरा पडतो. अशातच प्रचारासंबंधी विविध परवानग्या मिळविण्यात वेळ जातो. परवानगी घेतली नाही तर कारवाईची भिती असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घेतलेला हा निर्णय उमेदवार व राजकीय पक्षांना दिलासा देणारा आहे. राजकीय पक्ष आणि मतदारांसाठी निवडणूक विषयक माहिती देण्यासाठी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारपासून स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे मतदारांना एसएमएसच्या माध्यमातून त्यांचे मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव सांगण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
८२ हजार मतदारांची वाढ
लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत एकूण ८२ हजार मतदारांनी त्यांच्या नावाची नोंद केली आहे..
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार खर्च मर्यादा २८ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांच्या खर्चाचे विवरण रोज सादर करावे लागणार आहे.