एकाच रात्रीत ६९ गुन्हेगार जेरबंद पोलीस अलर्ट : गुंड गजाआड
By Admin | Updated: May 27, 2015 02:54 IST2015-05-27T02:54:11+5:302015-05-27T02:54:11+5:30
पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी सोमवारी पोलीस अधिकाऱ्यांचा क्लास घेतल्यानंतर काही तासातच चांगले परिणाम समोर आले.

एकाच रात्रीत ६९ गुन्हेगार जेरबंद पोलीस अलर्ट : गुंड गजाआड
नागपूर : पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी सोमवारी पोलीस अधिकाऱ्यांचा क्लास घेतल्यानंतर काही तासातच चांगले परिणाम समोर आले. फरार आणि तडीपार गुंडांसह अनेक कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. त्यात अनेक फरार, तडीपार अन् कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे. उपराजधानीत गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी वसुली, जबरी चोऱ्या आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली. ते बघता पोलीस आयुक्त यादव यांनी सोमवारी दुपारी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अनेकांचे कान टोचले. सराईत गुन्हेगार, तडीपार, फरार गुन्हेगारांच्या मुसक्या बांधा, असे खणखणीत आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, उपराजधानीत सोमवारी सायंकाळपासून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. रात्री झोपडपट्टी सर्चिंगही झाली. त्यात पोलिसांना तब्बल ६९ गुन्हेगार मिळाले. आकाश भूदेव सहारे, जितू ऊर्फ जितेंद्र पुंडलिक भगत, शेख मोहसीन शेख इस्माईल, राजू लक्ष्मण पेटकर, मनीष रा. जुना बाबुलखेडा, मनीष राजकुमार सहारे आदी गुन्हेगारांचा त्यात समावेश आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासीरकर, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय किशोर सुपारे, अविनाश शिळीमकर, एस़ एम. गायकवाड, के़ आऱ सिंह, एस़ डी़ महाडिक, जी.जी़ ताथोड, एऩ बी़ पवार, सूर्यवंशी, सी़ पी़ ढोले, पीएसआय एम़ पी. देसाई, अब्दुल वहाब यांच्या नेतृत्वात ही कामगिरी बजावली. दरम्यान सूरज सुरेश अरसपुरे या प्रॉपर्टी डीलरला खंडणी मागून धमकी देणारा कुख्यात तडीपार आरोपी नीतेश मूलचंद पटले याला कळमन्याचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, पीएसआय के़ आऱ चौधरी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी जेरबंद केले. (प्रतिनिधी)